Pune Accident :  पुण्यात मागील काही दिवसांपासून अपघाताचं प्रमाण खूप वाढलं आहे. कात्रज-कोंढवा रोडवर इस्कॉन टेंपल चौकाजवळ आरएमडी शाळेसमोर अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ज्ञानेश्वर वाल्मीक लवांडे (वय -50 वर्षे ,राहणार कपिल मल्हार बाणेर गाव, पुणे) आणि उषा ज्ञानेश्वर लवांडे (वय- 45 वर्ष) असे अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहे. दोघेही नातेवाईकाच्या दहाव्याला जात होते. त्याचदरम्यान दोघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. 


दोघे पती-पत्नी सकाळी अॅक्टिव्हा दुचाकीवरून जात होते. त्यावेळी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे आणि लवांडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर पसरला आहे. 


दहाव्याला जात असताना दुर्दैवी अपघात


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लवांडे दाम्पत्य हे बाणेर वरून कोथळे पुरंदरकडे दहाव्याच्या कार्यक्रमासाठी जात होते. कोंढवा परिसरात आरएमडी शाळेसमोर कात्रज- कोंढवा रोड कोंढवा बुद्रुक येथे त्यांची दुचाकी क्रमांक एम एच12 व्ही एच 9789 होंडा एक्टिवा गाडी वरून जाताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरात भीषण धडक दिल्याने त्यांचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.या अपघाताची माहिती मिळताच, कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत तसेच स्थानिकांकडून पसार झालेल्या वाहनाची आणि वाहनचालकाची माहिती काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.


अपघातांना ब्रेक कधी?


पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी भोर परिसरात एका बसने पेट घेतला होता. थोड्या प्रमाणात या आगीची चाहूल लागताच चालकाने सर्व प्रवाशांना बाहेर काढलं होतं. त्यानंतर बसमध्ये अचानक भडका उडाला होता. चालकाच्या प्रसंगावधानामुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे सगळ्यांकडून चालकांचं कौतुक करण्यात येतं. मात्र अपघात कधी थांबतील आणि नागरिक सुरक्षित प्रवास कधी करु शकतील, असा प्रश्न अनुत्तरितच आहे.