Pune Accident : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pune airport) गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एअर एशियाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. 34 वर्षीय विविन अँथनी डॉमिनिक असे तरुणाचं नाव होतं. तो लोहेगावचा रहिवासी होता आणि एअरलाइनमध्ये सुरक्षा एजंट म्हणून काम करत होता. त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
एअर एशियाच्या विमानातील प्रवासी विमानात चढल्यानंतर सकाळी 6.20 च्या सुमारास ही घटना घडली. डॉमिनिक विमानात चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी वापरल्या जाणार्या पायऱ्यांच्या शिडीवर असताना त्याचा तोल गेला आणि तो पडला. त्यांना तातडीने सह्याद्री रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले.
15-767 क्रमांकाचे विमान सकाळी 6.35 वाजता दिल्लीसाठी रवाना झाले होते. अधिक माहितीनुसार डोमिनिक विमानाच्या आत होता आणि पायऱ्या शोधत असताना त्याला पायऱ्या दिसल्या नाहीत. तो बाहेर पडला आणि त्याचा तोल जाऊन खाली पडला. या घटनेची नोंद विमानतळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
एअर एशियाच्या प्रवक्त्याने आपले कर्तव्य बजावत असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या निधनामुळे दु:ख झाल्याचे सांगून शोक व्यक्त केला आहे. कंपनीने डॉमिनिकच्या कुटुंबाला या कठीण काळात आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. कंपनी या घटनेची सखोल चौकशी करेल, असे आश्वासनही प्रवक्त्याने जनतेला दिले. त्यांनी सांगितले की, कंपनी अपघाताचे कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत काम करेल.
पुणे विमानतळावर पाच एरोब्रिज आहेत ज्यांचा वापर प्रवाशांना चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी केला जातो. हे एरोब्रिज सकाळच्या वेळेत पूर्णपणे व्यापलेले असतात, कारण पहाटे 4:50 ते सकाळी 8 पर्यंत विमानतळावर गर्दी असते. अपघाती मृत्यूची चौकशी सुरू असल्याचे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्यासंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल,असंही त्यांनी सांगितलं आहे.
तोल गेला अन् मृत्यूनं गाठलं...
मागील काही दिवसांमध्ये अपघाताचं प्रमाण वाढत आहे. किरकोळ कारणावरुन अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. विमानतळावर यापूर्वी अशा किरकोळ घडना घडल्या आहेत. मात्र त्यात कोणाचा जीव गेल्याचं समोर आलं नाही. यावेळी मात्र या तोल जाऊन पडल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्या कर्मचाऱ्यांच्या अपघाती मृत्यूने विमानतळाच्या कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.