पुणे: पुण्यातील गणोशोत्सव सोहळ्यासह विसर्जन मिरवणुकीला मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित राहतात, त्यामुळे शहरात मोठी गर्दी होती, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील निर्माण होते, या निमित्ताने शहरातील विसर्जन मिरवणुकीनिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. शहरातील मध्य भागातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी खुले करून देण्यात येणार आहेत.


मंगळवारी (17 सप्टेंबर) सकाळी साडे दहाच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. मिरवणूक सुरू होण्यापूर्वी मध्य भागातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता गुरू नानक या रस्त्यांवरील वाहतूक विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत बंद राहणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे. 


त्याचबरोबर जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक, छत्रपती शिवाजी रस्त्यावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा, मुदलियार रस्त्यावरील दारूवाला पूल, लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर पोलीस चौकी, सोलापूर रस्त्यावरील सेव्हन लव्हज् चौक, सातारा रस्त्यावरील व्होल्गा चौक, बाजीराव रस्त्यावरील वीर सावरकर पुतळा चौक, लाल बहाद्दुर शास्त्री रोडवरील सेनादत्त पोलीस चौकी, कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील गोखले स्मारक चौकातून वाहतूक वळवण्यात (डायव्हर्जन पॉइंट) येणार आहे.


विसर्जन मार्गावर वाहने लावण्यास मनाई


लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्त्यावर वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. खंडुजीबाबा चौक ते वैशाली हॉटेल चौक या रस्त्यांवर वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.


वर्तुळाकार मार्ग सुरू राहणार


कर्वे रस्ता-नळस्टॉप चौक- विधी महाविद्यालय रस्ता- सेनापती बापट रस्ता-गणेशखिंड रस्ता- वेधशाळा चौक- संचेती रुग्णालय-अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक- मालधक्का चौक- बोल्हाई चौक-नरपतगिरी चौक-नेहरु रस्ता-संत कबीर चौक-सेव्हन लव्हज् चौक- मार्केट यार्ड वखार महामंडळ चौक- शिवनेरी रस्ता- सातारा रस्ता- व्होल्गा चौक (लक्ष्मीनारायण चौक)-मित्रमंडळ चौक- सिंहगड रस्ता-शास्त्री रस्ता- सेनादत्त पोलीस चौकी- म्हात्रे पूल-नळस्टॉप चौक असा वर्तुळाकार मार्ग राहणार आहे.


शहरात 48 तास अवजड वाहनांना बंदी 


गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मध्यरात्रीनंतर शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती देखील वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.