Gaja Marne: पुणे : रील्स बनवून हवा करणे, सोशल मीडियातून लोकांपर्यंत पोहोचणे किंवा रिल्सच्या (Reel) माध्यमातून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सध्या सर्रास केला जातोय. अनेकदा वाढदिवसाचे किंवा मिरवणुकीचे, एखाद्या कार्यक्रमाचे रिल्स बनवताना हाती कोयता, तलवार किंवा इतर शस्त्रे घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्नही काही समाजकंटकांकडून केला जातो. मात्र, आता चक्क पुण्यातील गुंड गजा मारणेचा (Gajanan marne) एका व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्या रिल्समुळे गजा मारणे चांगलाच अडचणीत आला असून पुणे पोलिसांनी (Police) त्याच्यावर कारवाई केली आहे. गेल्या 4 तांसापासून पुण्यातील (Pune) गुन्हे शाखेच्या कार्यालयात गजा मारणेची झाडाझडती घेतली जात आहे. तसेच, त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटचाही तपास केला जात आहे. 


पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला रील्स बनवणं चांगलंच महागात पडल आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गेल्या चार तासांपासून गजानन मारणेची गुन्हे शाखेच्या कार्यालयात झाडाझडती घेण्यात आली. गजानन मारणेच्या नावानं GM boys नावाचं इन्स्टा अकाऊंट आहे. या अकाउंटवर गजानन मारणेचे साथीदार गजानन मारणेचा उल्लेख करताना डॉन, भाई अशा प्रकारे उल्लेख असलेले रील्स टाकत असतात. या रील्सचा परिणाम तरुण पिढीवर होऊन ती गुन्हेगारीकडे आकर्षित होत असल्याचं सांगत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी दहीहंडीच्या दिवशी मंत्री चंद्रकांत पाटील यांची गजानन मारणेने भेट घेतल्याचे रील्स असेच व्हायरल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी गजानन मारणेला गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं.  गजानन मारणे हा टीपू पठाण नावाच्या साथीदाराच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करतो. तरुण पिढीवर या व्हिडिओजचा मोठा परिणाम होत असल्याचं पोलीसांच निरिक्षण आहे. त्यामुळे गजानन मारणेसह टीपू पठाणला देखील गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलवण्यात आलं आहे. 


दरम्यान, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शहरातील नामचीन गुंडांची पोलिसांकडून धींडदेखील काढण्यात आली होती. त्यामधे गजानन मारणेचा देखील समावेश होता. त्यानंतर काही दिवस शांत राहिलेला गजानन मारणे सोशल मीडियावर पुन्हा सक्रीय झाला आहे. त्यामुळे, पोलिसांकडूनही गजा मारणेवर करडी नजर ठेवली जात असून त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरही पोलिसाचं लक्ष आहे. 


तुरुंगातून सुटल्यानंतर चर्चेत


पुण्यातील गुंडगारी विश्वात गजा मारणे हे नाव नवीन नाही. तुरुंगात सुटका झाल्यानंतर गजा मारणेनं त्याच्या साथीदार व सहकाऱ्यांस गाड्यांचा ताफा घेऊन शक्तीप्रदर्शन केलं होतं. तर, काही दिवसांपूर्वी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनीही गजा मारणेच्या घरी भेट दिल्यामुळे गजानन मारणे माध्यमांत चर्चेत आला होता. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी गजानन मारणेकडून चाचपणी केली जात असल्याचीही चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे.  


हेही वाचा


दुर्दैवी...रेल्वे पुलाखाली पाण्यात बुडाली SUV कार; बँक मनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू