पुणे : राज्यात एक बाजूला कोरोनाबाधिताच्या उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना  दोन दिवसापूर्वी  पुण्यातील चाकणमध्ये 12 ऑक्सिजन सिलेंडर चोरल्याची घटना घडली आहे. यामुळे ऑक्सिजन टंचाईची दाहकता लक्षात येत असून अशा पद्धतीने ऑक्सिजन सिलेंडरची बहुधा राज्यातील ही पहिलीच घटना असावी.


कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारात ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू हा उपचाराचा भाग म्हणून मोठे योगदान देत आहे. कारण या कोविड-19 या विषाणूमुळे होणाऱ्या आजारात घशावाटे फुफ्फुसांवर हल्ला होत असतो. यामुळे अनेक रुग्णांना श्वसनाच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. फुफ्फुसाच्या शेवटच्या भागाला असणारा भाग त्याला शास्त्रीय भाषेत अल्वेओलाय (वायुकोश) असे संबोधिले जाते. या भागाद्वारेच आपण जो नैसर्गिक दृष्ट्या बाहेरच्या वातावरणातील ऑक्सिजन घेतो आणि तो शरीरातील रक्ताला पुरवठा केला जातो. जर याच भागाला इजा झाली तर मग श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग अनेकवेळा रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासते.

याप्रकरणी पिंपरी येथील चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सोनटक्के यांनी एबीपी डिजिटल शी बोलताना सांगतिले कि, "अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. याप्रकरणी तक्रादार वाहनचालक महिंद्रा पीक अप चे मालक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी त्यांच्या घराबाहेर पार्किंग करून ठेवलेल्या या टेम्पोत 12 ऑक्सिजनने भरलेलं सिलेंडर आणि 7 रिकामे सिलेंडर ठेवले होते. मात्र तीन दिवसापूर्वी भल्या पहाटे हा टेम्पो चोरीला गेल्याचे सांगितले आहे. चोरटयांनी हा टेम्पो चोरण्यामागे ऑक्सिजनचे सिलेंडर चोरण्याचा उद्देश असावा असे सध्या वाटत आहे. सगळ्या गोष्टी तपासाअंती लक्षात येतीलच."

काही दिवसापूर्वीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत वैद्यकीय प्राणवायू उत्पादकांना वैद्यकीय क्षेत्रासाठी 80% आणि उद्योगांसाठी 20 टक्के या प्रमाणात प्राणवायू पुरवठा करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी राज्यात डिसेंबर 2020 पर्यंत लागू राहील.यापूर्वी उद्योग क्षेत्रासाठी 50 ते 60% आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी 40 ते 50% या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा केला जायचा.

प्राणवायूची कमतरता राज्याच्या विविध भागात जाणवत असल्याच्या तक्रारी येत असून या सगळ्या परिस्थितीवर राज्याचा अन्न आणि औषध प्रशासन विभाग लक्ष ठेवून आहे. विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य परिषदेच्या निर्देशानुसार ऍक्टिव्ह रुग्णसंख्येच्या 15% रुग्णांना कोरोनाच्या उपचारात ऑक्सिजनचा वापर होत आहे, त्यानुसार सध्याच्या घडीला 890 मेट्रिक टन म्हणजेच दिवसाला 8 लाख 90 हजार लिटर ऑक्सिजनची गरज भासत आहे. भविष्यात ज्या पद्धतीने रुग्ण वाढतील त्याप्रमाणे  आणखी प्रमाणात ऑक्सिजन लागण्याची शक्यता नाकारता येत नसून उत्पादकांना ऑक्सिजनची क्षमता वाढविण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहे.