पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक पुनित बालन (Punit balan) यांंच्यावर अनाधिकृत फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स लावून सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण केल्यामुळे महापालिकेने 3 कोटी 20 हजारांचा दंड ठोठावला होता. मात्र महापालिकेच्या या दंडाच्या कारवाईला सडेतोड उत्तर दिलं आहे. पालिकेने दिलेली नोटीस ही बेकायदेशीर आणि चुकीची असल्याचा दावा पुनित बालन यांनी केला आहे. सोबतच नोटीस मंडळाना देण्याऐवजी जाणूनबुजून आणि वैयक्तिक आकसापोटी माझी बदनामीसाठी माझ्या नावे नोटीस दिली आहे, असा आरोपही त्यांनी महापालिकेवर केला आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख आणि उपाआयुक्त माधव जगताप यांनी बालन यांनी नोटीस पाठविली होती. त्यात दंडासह बालन यांच्याकडून खुलासा देखील मागवला होता. त्यावर आता पुनित बालन यांनी खुलासा केला आहे. सार्वजनिक उत्सव सादर करणे आणि त्यास निःशुल्क मान्यता देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 14 सप्टेंबर रोजी बैठक घेवून निर्णय घेतला आहे, असे वृत्तपत्रात आले आहे. शहरातील गणेशोत्सव कालावधीत रस्ता, पदपथावर उभारण्यात येणाऱ्या मान्य मापाच्या उत्सव मंडप, स्टेज करीता पूर्वीपासूनच कोणतेही परवाना शुल्क आकारण्यात येत नव्हते. तसेच 2019 पूर्वी स्थानिक पोलीस विभागाकडून मान्यता दिलेल्या स्वागत कमानी आणि रनिंग मंडप यांना आकारण्यात येत असलेले परवाना शुल्क देखील महानगरपालिका आकाशचिन्ह परवाना व विभाग मुख्य सभा ठराव क्रमांक 564 नुसार रद्द करण्यास मान्यता दिलेली असून त्याबाबत 2019 पासून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
शहरात सन 2019 गणेशोउत्सव कालावधीत मोहरम, दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळाना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने देण्यात आलेल्या नि: शुल्क परवानगी ही पुढील 5 वर्षा करीता म्हणजेच 2022 पासून 2027सालापर्यंत गृहीत धरण्याबाबत महानगरपालिकेकडून सार्वजनिक गणेशोत्सव 2022 करीता सर्व गणेश मंडळे, पोलीस अधिकारी आणि मनपा अधिकारी यांच्या बैठकीत एकत्रित निर्णय घेण्यात आलेला होता. या सर्व गोष्टींचा विचार करता जगताप यांनी पाठविलेली नोटीस ही माझे व्यक्तिमत्व बदनाम करण्यासाठी जाणूनबुजून मला पाठवली आहे, असे आरोप पुनित बालन यांनी केला आहे. पुनित बालन यांनी लावलेल्या अनधिकृत जाहिराती पुणेकरांमध्ये वादाचा मुद्दा बनला होता. विशेषत: त्यांनी ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात लावण्यात आलेल्या बॅनर्समुळे अडथळा निर्माण केला आहे. अनेकांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या.
इतर महत्वाची बातमी-