पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे. पोलिस (Police) गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र दिवसेंदिवस अशा अनेक घटना समोर येत आहेत. अशातच हुक्का पार्लर चालकाकडून पोलीस उपनिरीक्षक हफ्ता घेत असल्याची माहिती समोर आली आहे. हुक्का पार्लर चालकाकडून 20 हजाराचा हप्ता घेणारा संबंधित पोलीस उपनिरीक्षक अखेर निलंबित करण्यात आला आहे. पुणे पोलिस (Pune Police) दलातील हफ्तेबाज पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. पुण्यातील वानवडी भागातील अवैध हुक्का पार्लर सुरू ठेवण्यास तो परवानगी देत होता अशी माहिती आहे. तर विशाल पवार असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वानवडी परिसरात एका हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी (Pune Police) या ठिकाणी धाड टाकून कारवाई केली. यावेळी पोलिसांनी हॉटेल चालकाचा मोबाईल तपासला असता वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार हाच वेळोवेळी माहिती करत असल्याचे समोर आले. इतकचं नाही, तर या पोलीस उपनिरीक्षकाला संबंधित हॉटेल चालक दरमहा वीस हजार रुपये हप्ता देत असल्याचंही समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी या संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे.
कोथरूड परिसरात सपासप वार करत तरुणाचा खून
पुण्यातील कोथरुड भागात दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर सपासप वार करत त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. तीन ते पाच जणांच्या टोळक्याने तरुणावर धारधार शस्त्राने वार केला. राहुल जाधव असे या मृत्युमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे. वार केल्यानंतर हल्लेखोर सागर कॉलनीतील गल्लीमध्ये जोरात ओरडा करत, कोयते नाचवत पळून गेल्याची माहिती आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे आरोपींच्या पैकी नसलेल्या एका तरुणाच्या आईसोबत प्रेम संबंध होते. याची माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी राहुल याला जीवे मारण्याचे ठरवलं आणि तयारी केली बनवला. कोथरूड परिसरात काल सव्वा पाच वाजता गजबजलेल्या सागर कॉलनीमध्ये राहुल जाधव हा त्याच्या दुचाकी वरून जात असताना चार जणांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला. त्याला काही वेळातच रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. संबंधित 4 आरोपी अल्पवयीन असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.