पुणे: पुण्यात काल (गुरुवारी ता. 30) गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) तीन नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधित रुग्णसंख्या आता 130 वर पोहचली आहे. त्यातील 20 रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 130 रुग्णांपैकी 25 रुग्ण पुणे महापालिका, 74 रुग्ण महापालिका समाविष्ट गावांतील, 13 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिकेत, ग्रामीणमध्ये नऊ तर इतर जिल्ह्यातील नऊ रुग्णांचा समावेश आहे. 'जीबीएस'मुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, आतापर्यंत पुणे महापालिका क्षेत्रातील 37 हजार 803 , पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील नऊ हजार 69 तर ग्रामीणमधील 11 हजार 373 घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीतील सिंहगड रोड व जवळील परिसरामध्ये जास्त रुग्ण आढळले आहेत. दूषित पिण्याचे पाणी व दूषित अन्न याद्वारे संशयित रुग्ण आढळल्याने या भागात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. काल (गुरुवारी दि. 30) सकाळी केंद्रीय टीम आणि राज्य शीघ्र प्रतिसाद पथकाची बैठक घेण्यात आली होती. बैठकीमध्ये सर्व रुग्णांच्या प्रयोगशाळा तपासणी करण्यासाठी एनआयव्हीकडे पाठवण्यात येणाऱ्या नमुन्यांची संख्या वाढवून प्रत्येक रुग्णाचे 3 नमुने (रक्त, लघवी व शौचाचा) पाठवण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय पथकाच्या पाहणीचा अहवाल पुढील दोन दिवसांत महानगपालिकेला सादर केला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
बाधित गावातील जलवाहिन्या ड्रेनेज लाईनची दुरुस्ती युद्ध पातळीवर
गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) आजाराचा सर्वाधिक प्रादुर्भाव पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील धायरी, नांदेड गाव, किरकटवाडी या भागांमध्ये झाला आहे. येथील अनेक ठिकाणच्या जलवाहिन्या ड्रेनेजलाइनमधून गेल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर प्रशासनाला जाग आली असून, खराब जलवाहिन्या बदलणे आणि दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. सिंहगड रस्त्यावरील नांदेड, नांदोशी, किरकटवाडी व धायरी या जीएसबीबाधित गावांतील गळती होणाऱ्या ड्रेनेजलाइनच्या दुरुस्तीचे काम प्रशासनाने युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
काय काळजी घ्यावी
पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?
दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.
कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे
अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या