पुणे : बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या प्रकरणात बुधवारी मोठी कारवाई करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या चार अधिकाऱ्यांसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अधिकाराचा गैरवापर करत नियम डावलून डीएसकेंच्या नसलेल्या कंपन्यांना कर्ज दिल्याचा ठपका या बँक अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. पुणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
आरोपींमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांचाही समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्र बँकेचे तत्कालीन क्षेत्रीय व्यवस्थापक एन एस देशपांडे, बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत, बँकेचे कार्यकारी संचालक आर के गुप्ता, डी एस कुलकर्णी यांच्या कंपन्यांचे मुख्य अभियंता राजीव नेवासकर, डी एस कुलकर्णी यांचे सीए सुनील घाटपांडे यांना आज अटक झाली आहे.
बँक अधिकाऱ्यांवर काय आरोप आहेत?
- डीएसकेंच्या प्रकल्पाला ज्या कारणासाठी कर्ज देण्यात आले, त्या पैशाचा बँक अधिकाऱ्यांशी संगनमताने अपहार करण्यात आला.
- भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलं नाही.
- सार्वजनिक संस्थांच्या पैशांचा उपयोग खाजगी पैसा असल्यासारखा करण्यात आला. या व्यवहारांमध्ये कोणताही कायदेशीरपणा नव्हता.
- बँकेने नियम डावलून बेकायदेशीररित्या कर्ज मंजूर केलं.
- कर्ज मंजूर करण्यापूर्वी कोणतीही खबरदारी घेतली नाही.
- कर्ज मंजूर करताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे नियमांचे पालन झाले नाही.
- कर्ज ज्या कारणासाठी दिले होते ते त्याच कारणासाठी ते वापरले जात आहे की नाही हे तपासले नाही.
डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांनाही आज ताब्यात घेतलं गेलं असून त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वी शिरीष कुलकर्णी यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने शिरीष कुलकर्णी यांची याचिका फेटाळली होती.
काय आहे डीएसके घोटाळा?
डीएसकेंवर गुंतवणूकदारांची फसवणूक करत तब्बल 2 हजार 43 कोटींच्या घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी कुलकर्णी दाम्पत्यावर 36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. डीएसके आणि हेमंती यांना 17 फेब्रुवारीला अटक झाली होती. आधी दोघंही पोलिस कोठडीमधे होते, त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.
डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी केलेल्या पैशांच्या गैरव्यवहारात आणखी तिघांचाही समावेश असल्याचं उघड झालं होतं. डीएसकेंच्या भावाचा जावई केदार वांजपे, त्याची पत्नी (डीएसकेंची पुतणी) सई वांजपे आणि डीएसके कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर यांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली होती. केदार वांजपे हा डीएसकेंच्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक होता. ड्रीम सिटीचं अधिग्रहण करण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती.
संबधित बातम्या
डीएसके प्रकरणात महाराष्ट्र बँकेच्या ४ अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
हायकोर्टाकडून डीएसकेंच्या मुलाला शरण येण्याचे आदेश
डीएसकेंची कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यासाठी अधिसूचना जारी