पिंपरी चिंचवड : आनंदनगर झोपडपट्टीतील शेकडो नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरले. यावेळी मात्र आक्रमक भूमिका घेत त्यांनी दगडफेक आणि तोडफोड केली. तसेच कंटेन्मेंट झोन असल्याने पत्रे लावून करण्यात आलेले सील ही तोडले. 13 मे पासून हा परिसर सील करण्यात आला आहे.


धारावी प्रमाणेच येथे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अवघ्या 25 दिवसांतच इथल्या कोरोना रुग्णांचा आकडा 200 पार झाला आहे. त्यामुळे येथे कंटेन्मेंट झोन कायम आहे. एकतर परिसरातील किराणा मालाची दुकानं बंद आहेत तर काहींची दुकानं खुली असली तरी पुरेसा माल उपलब्ध नाही. परिणामी नागरिकांवर उपासमारीची वेळ आली, असं येथील नागरिकांचे म्हणणे आहे. जेवणाची सोय प्रशासन करत नाही, अशी त्यांची ओरड आहे. 20 मे ला ही शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. तेव्हा ही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


त्यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जेवणाची सोय केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. पण त्यानंतर आज पुन्हा हे नागरिक आक्रमक झाले. दुपारी साडे तीनच्या सुमारास दगडफेक आणि प्रशासनाच्या खुर्च्यांची तोडफोड करत सीलचे पत्रेही हटवण्यात आले. काही दुचाकी गटारात फेकूनही दिल्या. तातडीने पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला. अर्ध्या तासानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. कायदा हातात घेणं ही नागरिकांची चूक आहेच पण प्रशासनाने त्यांची भूक भागवली नसेल यात ते ही दोषींच्या रांगेत उभे असतील.


20 मे रोजी काय घडलं होतं


पिंपरी चिंचवडच्या आनंदनगर झोपडपट्टीतील हेच शेकडो नागरिक 20 मे रोजी घराबाहेर पडले होते. आमच्या जेवणाची आणि रेशनिंगची सोय करा अशी त्यांची तेव्हा ही मागणी होती. त्यावेळी या परिसरातील 35 जण कोरोना बाधित होते. त्यामुळे हा परिसर सील करण्यात आल्याने जीवनावश्यक दुकानं बंद करण्यात आली होती. तेव्हा कोरोना बाधितांमध्ये किराणा दुकानदारांचा ही समावेश असल्याने प्रशासनाने ती दुकानं ही बंद केली होती. त्यातच मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने हा परिसर सील करण्यात आला.


किराणा दुकानं बंद त्यात परिसर सील असल्याने बाहेर ही पडता येईना होतं-नव्हतं तेवढं घरातील जीवनावश्यक वस्तू संपायला आल्या, अनेकांच्या संपल्या. त्यामुळे येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. ही बाब प्रशासनाच्या कानावर टाकण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून कानाडोळा करण्यात आल्याचे आजच्या 20 मे च्या दृश्यांवरून ही स्पष्ट झालं होतं. सील परिसराबाहेर पडायचं आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करायची अशाच मनस्थितीत तेव्हा ही हे नागरिक होते. पण बंदोबस्ताला उपस्थित पोलिसांनी त्यांना वेळीच रोखलं होतं. पण भुखेल्या पोटाने सहनशीलता संपवली होती, अन्न भेटत नाही तोवर जागचे हलणार नाही अशी ठाम भूमिका सर्वांनी तेव्हा घेतली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मग उपस्थित पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकरांना घटनास्थळ गाठावं लागलं. आता तुमची भूक भागवली जाईल, तुम्हाला घरात जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जातील. हे आश्वासन मान्य करून नागरिकांनी तेव्हा घरची वाट धरली होती.