80 वर्षाच्या शांताबाई चिंचणे पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलिस स्टेशनच्या चकरा मारुन, पुरत्या वैतागल्या होत्या. तीन तोळ्याच्या चोरीला गेलेल्या पाटल्या, पोलिस आज शोधून देतील, उद्या शोधून देतील, या आशेने त्या नेहमी त्या पोलिसांकडे यायच्या. पण पाटल्या काही सापडत नव्हत्या.
आजीबाईंची तगमग पाहून, अखेर पोलिसांनाही पाझर फुटला आणि मग जागी झाली खाकीतली माणुसकी. सहाय्य्क पोलिस निरीक्षक बलभीम ननावरे यांच्यासह आठ सहकाऱ्यांनी स्वखर्चाने पाटल्या विकत घेऊन, आजींना दिल्या.
वयाच्या चौदाव्या वर्षी विवाह बंधनात अडकलेल्या शांताबाईंच्या संसाराला दृष्ट लागली अन् चार वर्षानंतर पती पिराजीने काडीमोड घेतली. पुढील आयुष्य जगण्यासाठी जन्मदात्यांचा सहारा घेतला, मात्र ते नियतीलाही सहन झालं नाही अन् काही वर्षांनी त्या पोरक्या झाल्या. मग सखख्या भावानेही घरातून हाकलून दिलं आणि सुरु झाला संघर्ष. 80व्या वर्षात आपलेसे कोणी नसताना, या पोलिसांनी दाखवलेली आपुलकी, या आज्जींना आयुष्यभराचं आनंद देत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणाऱ्या कारवाईत लाचखोर पोलिसांची संख्या अधिक आहे. तरीही पोलिसांची लाचखोरी काही कमी होईना. पण अशा मूठभर लाचखोरांमुळे अख्ख्या पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी यानिमित्ताने घडवलेल्या माणुसकीमुळे ही मलीन काही प्रमाणात तरी सुधारेल अशी अपेक्षा आहे.