म्हणून भाजप महापौर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसमोर नतमस्तक
एबीपी माझा वेब टीम | 10 Aug 2018 09:18 PM (IST)
पिंपरी चिंचवडचे भाजप महापौर राहुल जाधव यांनी मनसेमध्ये प्रवेश करुन राजकारणात एन्ट्री केली होती.
पिंपरी चिंचवड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या भाजपवर कडाडून टीका करत असताना, पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या महापौरांचं राज ठाकरेंवरील प्रेम आज दिसून आलं. नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव चक्क राज ठाकरेंसमोर नतमस्तक झाले. राज ठाकरे पिंपरी चिंचवडमध्ये एका खाजगी जिमचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी राहुल जाधव यांनी राज ठाकरेंच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली, तेव्हा राहुल जाधव यांनी मनसेमध्ये प्रवेश करुन राजकारणात एन्ट्री केली होती. मनसेच्या तिकिटावर ते 2012 साली पिंपरी महापालिकेत नगरसेवक म्हणून पहिल्यांदाच निवडून आले होते. 2017 साली भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर यंदा त्यांना महापौर होण्याचा मान मिळाला. महापौरपदाच्या निवडणुकीतही मनसेच्या एकमेव नगरसेवकाने जाधव यांनाच मत दिलं होतं. त्यामुळे जाधव यांच्या मनात मनसेविषयी अजूनही प्रेम असल्याचं या निमित्ताने दिसून आलं. रिक्षाचालक ते महापौर महापौरांच्या खुर्चीवर पहिल्यांदाच रिक्षाचालक व्यक्ती विराजमान झाली आहे. रिक्षाचालक ते महापौर असा खडतर प्रवास राहुल जाधव यांनी केला आहे. भाजपच्या इतिहासातील पिंपरी चिंचवडचा दुसरा महापौर होण्याचा मान राहुल जाधव यांना मिळाला. महात्मा फुलेंच्या वेशात आलेले राहुल जाधव महापौर आणि सचिन चिंचवडे उपमहापौर झाल्याची घोषणा होताच, पालिका आवारात भंडारा उधळून एकच जल्लोष करण्यात आला होता. मात्र जल्लोषाच्या वेळी भाजप कार्यकर्त्यांचा उन्माद पाहायला मिळाला. महापालिकेच्या आवारात जेसीबी आणि जिप्सीवर उभं राहून तब्बल 50 ते 60 पोती भंडारा उधळण्यात आला होता. भंडारा उधळून चिखल झाल्याप्रकरणी राहुल जाधव यांनी दिलगिरी व्यक्त केली. महापालिकेने या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला.