पिंपरी चिंचवड  : तीनशे कोटींचे बिट कॉइन हडपण्यासाठी पोलीस शिपायाने एकाचे अपहरण केले आणि खंडणी मागितली. यात त्याने गुन्हेगारांची मदत घेतल्याचं तपासात निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी त्यांच्या पोलीस शिपायासह आठ आरोपींना गजाआड केलं आहे.  वाकड पोलिसांनी शिथापीने तपास करत पोलीस शिपाई दिलीप खंदारेचे बिंग फोडले आहे. सायबर गुन्ह्याचा तपासात करताना पोलीस शिपाई खंदारेला माहिती मिळाली होती की,  विनय नाईक नावाच्या व्यक्तीकडे 300 कोटींचे बिट कॉइन ही क्रिप्टो करन्सी आहे. ती आपण मिळवली तर आपण मालामाल होऊ, असं त्याला वाटू लागलं. यासाठी विनयचे अपहरण करण्याचा कट त्याने रचला. मग पोलीस शिपाई खंदारेने प्रदीप काटे या ओळखीच्या व्यक्तीशी संपर्क साधला आणि काहींना सोबतीला घ्यायला सांगितले. 


वडगाव मावळच्या हॉटेलमध्ये हे सगळे भेटले आणि तिथं अपहरण कसं करायचं हे ठरलं. त्यानुसार 14 जानेवारीला विनयला ताथवडे येथील हॉटेल समाधानमधून उचलण्यात आले. विनयला एका गाडीत आणि अन्य आरोपी दुसऱ्या गाडीत असे सात जण अलिबागला पोहचले. तिथं पोलीस शिपाई खंदारे देखील पोहचला. मग विनयकडे बिटकॉइन आणि आठ लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. तोपर्यंत विनयच्या मित्राने वाकड पोलिसांनी याबाबत कल्पना दिली असल्याने तपासाची चक्र हलू लागली होती. आता खंदारे स्वतः पोलीस शिपाई आणि त्यात पिंपरी चिंचवड आयुक्तालयातच कार्यरत असल्याने पोलीस मागावर येत असल्याची कुणकुण लागली. म्हणून दुसऱ्या दिवशी विनयला वाकड हद्दीत आणून सोडले.


 विनयने पोलिसांकडे धाव घेत, घडला घटनाक्रम आणि आरोपींची माहिती दिली. वाकड पोलिसांनी सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपींची नावं निष्पन्न केली. मुंबई आणि ठाणे भागात जाऊन सुनील शिंदे, वसंत चव्हाण, फ्रान्सिस डिसुझा आणि मयूर शिर्केला ताब्यात घेतलं. चौकशीत प्रदीप काटेचे नाव समोर आले आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवताच खंदारेच मुख्य सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालं. 


पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात दिलीप खंदारे सध्या कार्यरत आहे. भोसरी येथील राहत्या घरातून त्याला 31 जानेवारीला बेड्या ठोकण्यात आल्या. तो मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील कोनाटी गावचा रहिवाशी आहे. पोलीस विभागातच कार्यरत असताना त्याने अनेक अॅडव्हान्स कोर्स केलेले आहेत. सेवांतर्गत ऑफिस ऑटोमेशन, सायबर गुन्हे प्रणाली, अॅडव्हान्स सायबर क्राईम इंव्हीस्टेशन टेक्नॉलॉजी, बेसिक ऑफ हार्डवेअर अॅण्ड नेटवर्क इन्फॉर्मेशन आणि मोबाईल फॉरेन्सिक कोर्सचा यात समावेश आहे. याच ज्ञानाचा त्याने या गुन्ह्यात अवलंब केला आणि पुणे सायबर क्राईम विभागात असताना विनय नाईकची माहिती मिळवली होती. या आधी 3 जुलै 2019मध्ये लाच घेतल्याप्रकरणी त्याला अटक झालेली होती. त्यानंतर या मोठ्या गुन्ह्यात तो मुख्य सूत्रधार म्हणून अटकेत आला. आता एका पोलीस शिपाईच असे कारनामे करत असल्याने खळबळ उडाली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: