Shirur Vabalevadi Innovative School : पुण्यातील वाबळेवाडीतील आदर्श शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे निलंबन तांत्रिक कारणास्तव जिल्हा परिषदेकडून मागे घेण्यात आले आहे.  जिल्हा परिषदेच्या वीस कर्मचार्यांची विभागीय आयुक्तांकडून चौकशी सुरु आहे. अशात त्यांच्या चौकशीत अडथळा येऊ नये यासाठी निलंबन मागे घेण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे.  या वीस कर्मचार्यांमधे काही विस्तार अधिकारी, काही शिक्षक आणि काही अभियंत्यांचा समावेश आहे.  


दत्तात्रय वारे गुरुजींसह या वीस जणांचे निलंबन मागे घेण्यात आले असले तरी त्यांची विभागीय चौकशी सुरुच राहणार आहे. या चौकशीच्या निकालानंतर वारे गुरुजींबाबत निर्णय घेण्यात येईल असे जिल्हा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करणाऱ्या दत्तात्रय वारे यांनी अभिनव संकल्पना राबवून ही शाळा नावारूपास आणली. मात्र त्यानंतर शाळेत देण्यासाठी पालकांकडून पैसै घेतले जात असल्याचा आरोप दत्तात्रय वारे आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या गावातील लोकांवर करण्यात आला. प्राथमिक चौकशीत दत्तात्रय वारे यांच्या बॅक अकाउंटमधे पैशांची देवाणघेवाण दिसून आल्यानंतर दत्तात्रय वारेंना निलंबित करण्यात आले होते.


2012 मधे वाबळेवाडीतील शाळेत शिक्षक म्हणून रुजु झाल्यावर दत्तात्रय वारे यांनी लोकसहभागातून शाळेचा विकास करण्यास सुरुवात केली.  पुढे 2016 साली त्यांचे काम बघुन आर्ट ऑफ लिव्हिंग आणि बॅक ऑफ न्यूयॉर्कने शाळेसाठी निधी दिला आणि वाबळेवाडीत आदर्श शाळा उभी राहिली.  या शाळेत फळा किंवा बाकडे न ठेवता विद्यार्थ्यांना मुक्त शिक्षण देण्यावर भर देण्यात आला. यामुळे खाजगी शाळांमधे शिकणारे विद्यार्थीही वाबळेवाडीतील या शाळेकडे वळले. वारे सरांच्या या कामाची दखल सर्वत्र घेण्यात आली आणि वाबळेवाडीतील शाळेसारख्या शाळा राज्यभरात उभारण्याची गरज अजित पवारांनी बोलून दाखवली होती. 


फक्त 34 पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील संख्या 9 वर्षात दत्तात्रय वारे यांनी 531 पर्यंत पोहचवली होती. या शाळेसाठी गावकऱ्यांनी कोट्यवधींच्या जमिनीही दिल्या. वाबळेवाडीमधील या शाळेतील उपक्रम प्रेरणादायी आहेत. इथं आठ वेगवेगळ्या भाषा शिकवल्या जातात. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी सहावीपासून केली जाते. भविष्यातील व्यवसाय कोणते असतील याचा परिचय, कोडिंग व प्रोग्रामिंग , इंग्रजी संभाषण असे कितीतरी उपक्रम या शाळेत रावबले जातात. आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षण प्रेमींनी या शाळेला भेट दिली आहे. या शाळेतील विविध भाषा शिक्षणाचे उपक्रम हे अनुकरणीय असून अनेक शाळा त्यांच्या प्रभावातून काम करत आहेत. या शाळेतील दत्तात्रय वारे यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांचे कौतुक केले आहे.