Laxman Jagtap Passed Away : पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगताप हे कर्करोगाची झुंज देत होते आज अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. लक्ष्मण जगताप हे तीन टर्म पिंपरी-चिंचवडचे आमदार राहिले आहे. लक्ष्मण जगताप यांचे पार्थिव अंत्यदर्शन घेण्यासाठी दुपारी 3 ते 6 या वेळेत त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी 7 वाजता त्यांच्यावर पिंपळे गुरव येथे अंत्यविधी होईल.


तीन वर्षांपासून कंर्करोगाशी झुंज


मागील तीन वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. भारतातच नाही तर परदेशात जाऊन त्यांनी उपचार घेतले होते. परदेशात उपचार घेतल्यानंतर त्यांनी प्रकृती सुधारली होती. मात्र गेल्या पाच-सहा महिन्यांपासून त्यांना या गंभीर आजाराने पुन्हा ग्रासलं होतं. त्यामुळे ते रुग्णालयात वारंवार उपचारासाठी जात होते. काही दिवसांपूर्वीही त्यांनी प्रकृती खालावली होती. मात्र त्यातूनही त्यांनी आजारावर मात केली होती. मात्र अखेर ही झुंज अपयशी ठरली. 


नगरसेवक ते आमदार...राजकीय पार्श्वभूमी


1986 पासून त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. 2002 पर्यंत ते नगरसेवक होते. याचदरम्यान त्यांनी स्थायी समितीचं अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यानंतर महापौरही होते. 2002 साली राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष होते. 2004 मध्ये राष्ट्रवादीतून बाहेर पडत विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला. त्यातून आपली राजकीय ताकद दाखवून दिली. 2004 साली विधान परिषदेचे आमदार होते. 2009 साली विधानसभेवरही आमदार होते. 2014 पासून सलग दोन वेळा भाजपचे विधानसभा आमदार होते. त्यानंतर 2017 मध्ये पिंपरीचे शहराध्यक्ष पद त्यांनी भूषवलं होतं. त्याचवेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. 


राज्यसभेच्या मतदानासाठी अॅम्ब्युलन्समधून मुंबईत दाखल 


10 जून 2022 रोजी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप अॅम्ब्युलन्समधून मुंबईत आले होते. अनेक महिन्यांपासून आजारी असलेल्या लक्ष्मण जगताप यांना 2 जून 2022 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक होती. आपल्या एकाही आमदारांचं मत कमी पडू नये यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करत होते. त्यातच पक्षाने आग्रह केल्याने लक्ष्मण जगताप मतदानासाठी रस्तेमार्गाने अॅम्ब्युलन्समधून पिंपरी चिंचवडहून मुंबईला मतदानासाठी आले होते.


भाजपने दुसरा आमदार गमावला...


तत्पूर्वी पुण्याच्या कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्त टिळक यांचंदेखी काही दिवसांपूर्वीच निधन झालं होतं. त्यांनाही कर्करोगाने ग्रासलं होतं. त्यांचं निधन भाजपसाठी मोठा धक्का होता. या सगळ्या परिस्थितीतून सावरत असतानाच आमदार लक्ष्मण जगताप यांंचं आज (3 जानेवारी) निधन झालं. दोन्ही आमदारांच्या निधनाने भाजपमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. 


संबंधित बातमी


Rajya Sabha Election 2022 : आजारी असल्याने आमदार लक्ष्मण जगताप मतदानासाठी अॅम्ब्युलन्सने मुंबईत