पिंपरी चिंचवड : कुणाची मुलं एका पक्षाशी काडीमोड घेऊन दुसऱ्या पक्षासोबत संसार थाटत आहेत, तर कुणाची मुलं निवडणुकीत नशीब अजमावण्यात व्यस्त आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा मात्र सपत्नीक देवदर्शनात दंग आहे.


ठाकरे कुटुंबाचं कुलदैवत असलेल्या आई एकवीरेच्या चरणी अमित आणि मिताली या नवदाम्पत्याने माथा टेकला. मितालीने यावेळी देवीची ओटी भरली. वैवाहिक आयुष्यात सुख-समृद्धी नांदावी, असं साकडं अमितालीने घातलं.


अमित आणि मिताली यांच्यासोबत आई शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या. नुकताच या दोघांचा थाटामाटात विवाह संपन्न झाला. यापूर्वी लग्नाची पत्रिका एकवीरा देवीच्या चरणी ठेवण्यासाठी शर्मिला ठाकरे इथे आल्या होत्या.

ठाकरे कुटुंबीय कार्ला एकवीरा इथे आले की मोठा राजकीय निर्णय घेतात. मात्र यावेळी अमितालीच्या भावी आयुष्यात भरभराट व्हावी म्हणून आशीर्वाद घेण्यासाठी ठाकरे कुटुंब इथे आलं होतं.