पिंपरी चिंचवड : आपल्याला आजोबांना म्हणजेच शरद पवार यांना पंतप्रधान करायचं आहे, तेच पंतप्रधान पदासाठी योग्य माणूस आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार
पार्थ पवार यांनी केली आहे. ते पिंपरी चिंचवड येते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या संयुक्त बैठकीत बोलत होते.


पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विकास केला आहे. आज माझा मित्र माझ्यासोबत फिरताना तो आवाक झाला. तो म्हणाला आसा विकास मी कुठे पाहिलं नाही. नरेंद्र मोदी त्यांच्या गुजरातचा मॉडेल देशभर ठेऊ शकतात तर आपण पिंपरी चिंचवडचा विकास राज्यभर का मांडू शकत नाही, असं पार्थ पवार म्हणाले.

मागील काही दिवसांपासून मी या भागात फिरतोय. मला इथल्या जनतेनं खूप प्रेम दिलं आहे. इतकं की मला हेच कळेना पार्थ पवार म्हणून तुम्ही प्रेम केलं की पार्थ म्हणून. मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलो आहे, असं देखील पार्थ पवार म्हणाले.


कदाचित मी 18 वर्षांचा असताना इथं काम सुरू केलं असतं तर आत्तापर्यंत माझं लग्नही झालं असतं. एवढं प्रेम दिलंय तुम्ही मला. उगाचच मी मुंबईमध्ये वेळ घालवला.
आता आपल्याकडे 35 दिवस राहिले आहेत. सर्वांनी एकत्र काम करायचं आहे, आपल्याला एकजुटीने काम करत आजोबांना पंतप्रधान करायचं आहे, असं पार्थ पवार म्हणाले.

आपण तरुणांवर लक्ष केंद्रीत करायला हवं. हा तरुणवर्ग कन्फ्युज असतो. त्यांना नेमकं काय करावं हेच कळत नाही. ते त्यांच्यात गुरफटलेले असतात. अशा तरुणांना आता तुम्ही सांगायला हवं की हा विकास राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे. ही तुमची जबाबदारी आहे, असं पार्थ पवार म्हणाले.

पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा हा दुसरा भाषण होतं. आजच्या भाषणादरम्यान त्यांच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. यापूर्वीच्या भाषणामुळे ते चांगलेच ट्रोल झाले होते. मात्र ते सुधारणा करत असल्याचं दिसत आहे. .