पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणावर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. अस असतानाच एक धक्कादायक घटना काही दिवसांपुर्वी घडल्याचं समोर आलं होतं. पिंपरी चिंचवडमधील बारा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. राहत्या घरात ही घटना 6 जून 2024च्या सायंकाळी बारा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना घडली होती. (Pune Crime News)


मात्र, तेव्हापासून या मुलीचे वडील अस्वस्थ होते. मुलीने असं टोकाचं पाऊल का उचललं असेल? घरात तर कोणी तिला काहीचं बोललं नाही? मग नेमकं काय घडलं? याचा शोध लावायचा चंग वडिलांनी बांधला. यासाठी तिच्या वस्तू आणि तिचे कपड्यांपासून तपासायला सुरुवात केली. तेंव्हा मुलीच्या ड्रेसच्या खिशात एक चिट्टी सापडली, त्यात मोबाईल नंबर आढळला. हा नंबर कुटुंबातील कोणाचाच नव्हता.  त्यामुळे वडिलांना शंका आली, मग आजूबाजूचे सीसीटीव्ही मिळवले. ते तपासले असता, त्यात दोन मुलं वारंवार तिच्या आसपास घुटमळत असल्याचं दिसून आलं. (Pune Crime News)


यानंतर क्षितिज पराड आणि तेजस पठारे या दोघांनी मुलीचा वारंवार पाठलाग केला आणि तिचा लैंगिक छळ केला, त्याच त्रासाला कंटाळून मुलीने गळफास घेऊन तिने टोकाचं पाऊल उचलले असल्याचा आरोप वडिलांनी केला. नुकतंच याप्रकरणी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सोचा गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.(Pune Crime News)


नेमकं काय घडलं?


पिंपरी-चिंचवडमध्ये बारा वर्षीय मुलीने 6 जून 2024च्या सायंकाळी राहत्या घरात रात्री साडेसातच्या सुमारास बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला. अल्पवयीन मुलीच्या वडील हे चहा विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांची चहाची टपरी आहे. यामधूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागतो. परंतु, आपल्या मुलीने आत्महत्या का केली? असा प्रश्न सतत त्यांना पडला होता. त्यानंतर त्यांनी स्वतः तपासाला सुरुवात केली. आसपास असलेले सीसीटीव्ही तपासले, परिसरात चौकशीही केली. याच दरम्यान, बारा वर्षीय मुलीच्या खिशात आरोपीच्या मोबाईल नंबरची चिठ्ठी मिळाली. यामुळे आरोपी हे मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत होते. तिचा लैंगिक छळ करत असल्याचा आरोप पालकांनी करत भोसरी पोलीस ठाण्यात ५ ऑक्टोबर २०२४ रोजी फिर्याद दिली. 


त्यानुसार, भोसरी पोलिसांनी देखील तात्काळ याप्रकरणी गुन्हा दाखल करून क्षितिज लक्ष्मण पराड आणि तेजस पांडुरंग पठारे या दोघांना अटक केली आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या कामावरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत, मुलीच्या वडिलांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर आता अटक झाली, याआधी पोलिसांनी याबाबत कोणती कारवाई केली असा सवाल नागरिक उपस्थित करताना दिसत आहे.