Ajit Pawar Baramati: विकासाच्या मागे उभा राहायचं की नाही याबाबतचा निर्णय तुम्ही आणि तुमच्या परिवाराने घ्यायचा आहे. बारामतीने माझ्यावर 33 वर्षे प्रेम केलं. बारामतीकरांच्या जोरावर मी राज्यभर सक्षमपणे फिरु शकलो. विविध पदांवर मी बसू शकलो. या ही निवडणूकीला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभा रहाल याबाबत शंका नाही. काहीजण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार (NCP Ajit Pawar) यांनी केलं. अजित पवारांच्या उपस्थितीत सोमवारी व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बारामतीतील जिजाऊ भवन येथे हा मेळावा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
पवार साहेबांनी या सर्व कामाला सुरुवात केली त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण बारामतीचा विकास कोणी केला?, मी कुठल्या निवडणूकीत निधी मागितला?,कधी कामातून एक कप चहा मागितला?, असे सवाल अजित पवारांनी (Ajit Pawar) उपस्थित केले. कन्या शाळेची इमारत बांधताना कदाचित वर्गणी गोळा केली असेल. पुढील काळात देखील बारामतीचा विकास कोण करेल याची जाणीव असल्याने तुम्ही योग्य विचार तुम्ही कराल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. तुमच्याकडे कोणीही आले तर ते सांगतील ते ऐकून घ्या. पण बटन दाबताना घड्याळाचंच बटन दाबा. देशात स्मार्ट सिटी म्हणून बारामतीची ओळख झाली. तुम्ही फक्त घड्याळाचे बटन दाबा, पुढील पाच वर्षात या शहराचा चेहरा मोहरा अजून चांगला करायची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे, असं अजित पवार म्हणाले.
अर्थसंकल्प सादर करीत असताना शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना दिल्या. राज्य सरकार दुधाला 7 रुपये अनुदान देते. लाईट बिले तर 7 एचपीपर्यंत शून्य केलीत. लाडकी बहीण योजना राज्यभर पॉप्युलर झाली. काहीजण म्हणाले लाडकि बहीण योजनेचे पैसे आलेत काढून घ्या, नाहीतर परत जातील...इथपर्यंत माझी चेष्टा मस्करी केली, अशी टीका अजित पवारांनी केली. बाजार समितीला 21 एकर जागा 1 रुपया नाममात्र किंमतीत उपलब्ध करुन दिली. मी जात-धर्म बघत नाही,बारामतीकरांचा फायदा बघतो. भिगवण रोड रूंद झाला,सुशोभिकरण होतयं. हे सर्व स्पाॅट निवडणूकी अगोदर पूर्णत्वाला न्यायचे होते. विचार करताना पुढील 50 वर्षे डोळ्यासमोर ठेऊन विचार करावा लागतो, असं अजित पवारांनी सांगितले.
पोलीस खात्याला मी सूचना दिल्या- अजित पवार
कायदा सुव्यवस्था फार महत्त्वाची जबाबदारी आहे. परवा जे टी. सी. कॉलेजमध्ये घडलं, हे माझ्याही मनाला पटलं नाही. यात तुमचही मला सहकार्य हवं आहे. पोलीस खात्याला ही सुचना दिल्या आहेत. कुणाची दादागिरी, गुंडगिरी मी बारामतीचे नेतृत्व करतोय तोपर्यंत चालू देणार नाही. जबाबदार नागरिक म्हणून काही आपली पण जबाबदारी आहे.
माझ्यासारखी कॉलिटी तुम्हाला मिळणार नाही- अजित पवार
या पाच वर्षात मी जे बारामतीकरांसाठी केलं, ते यापूर्वीच्या कोणत्या टर्ममध्ये मला करता आलं नाही. तीन वर्षात बरचं काही करु शकलो. काही आमदार इथे येतात बघतात आणि म्हणतात आम्हाला तुमच्यासारखं करायचे आहे. मी म्हणालो तुम्ही करा पण माझ्यासारखी कॉलिटी तुम्हाला मिळणार नाही. ते म्हणाले का?, मी म्हणालो तुम्ही नुसतचं काम करायला लावता पण बारकावे पाहत नाही. आम्ही चुकलं तर उतरवायला लावतो आणि पुन्हा करायला लावतो. कामाच्याबाबतीत कुठेही कमी पडलो नाही. क्रीडा संकूल पूर्ण झाल्यावर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील- अजित पवार
पूर्वी पवारांकडून जेवणं मिळत नव्हती. काहीच मिळत नव्हतं. पवार भेटायलाही येत नव्हते. कुठे काय झालं तर मी कधीतरी भेटायचो. आता शहरात लोक फिरायला लागली, घमेली वाटायला लागली. साड्या वाटायला लागली. असं सगळं व्हायला लागलं आहे. त्या निमित्ताने पवार घरी यायला लागले हे बरं झालं ना...आता नावं माहित नसलं तरी मी ओळखते तुम्हाला……ओळखते… तुम्हाला. कधी नव्हे तो अजित पवारही हसायला लागलाय. मिळतयं ते घ्या, सोडू नका पण घड्याळाला मतदान करा...तुमच्या मनात जो उमेदवार आहे तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील, असं मोठं विधानही अजित पवारांनी केलं. पुन्हा मला येता येणार नाही. मला राज्यात फिरावं लागणार आहे. आता तुमची सर्वांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडा, असे निर्देशही अजित पवारांनी दिले.
संबंधित बातमी:
जावई कुणाचाय, तुम्ही विधानसभेत पाठवा, मी..; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना मंत्रीपदाचे संकेत