पिंपरी-चिंचवड : चहावरुन झालेल्या वादात अपमान झाल्याचा समज करुन एकाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधल्या देहू गावामध्ये हा प्रकार घडला. सचिन पवार याने सुसाईड नोटमध्ये याबाबत उल्लेख केला आहे.
देहू गावात राहणाऱ्या सचिन पवार याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. चाकण येथील यश इंडस्ट्रीज कंपनीत सचिन नोकरी करायचा. नाश्त्यासोबत चहा दिला नसल्याची तक्रार त्याने सुपरवायझरकडे केली. मात्र तक्रार ऐकून घेण्याऐवजी त्यांनीही सचिनचा अपमान केल्याचा दावा केला जात आहे. अपमान सहन न झाल्याने सचिनने आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोट मध्ये नमूद केलं आहे.
काय आहे सुसाईड नोट?
मी काल कँटीनमध्ये गेलो असता नाश्ता आणि चहा मागितला. तेव्हा मला नाश्ता देण्यात आला, मात्र चहा दिला गेला नाही. म्हणून मी याची तक्रार सुपरवायझरकडे केली, परंतु उलट तेच सर्वांसमोर माझ्यावर ओरडले. त्यामुळे माझा अपमान झाला. अपमान हा अपमानच असतो, त्यामुळे मी हे जग सोडून जातोय.