पिंपरी - चिंचवड : राज्यात पुन्हा एका काका पुतण्यांच्या संघर्षाचा नवा अंक सुरु झाला असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जात आहे. कारण अजित पवार (Ajit Pawar) यांनी रोहित पवारांच्या (Rohit Pawar) आरोपांना जशाचं तसं उत्तर दिलं आहे. पिंपरी चिंचवडचा कायापालट मी केला असल्याचं वक्तव्य करत अजित पवारांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान शरद पवारांमुळे अजित पवारांचं पिंपरी चिंचवडमध्ये महत्त्व वाढलं असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं होतं. 


बारामती खालोखाल पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पण या बालेकिल्ल्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वर्चस्व असल्याचं म्हटलं जातय पण हाच  बालेकिल्ला पुन्हा एकदा शरद पवारांना काबीज करायचायं. त्यासाठी शरद पवारांनी त्यांचा नातू आणि आमदार रोहित पवारांना मैदानात उतरवलं असल्याचं चित्र सध्या आहे. म्हणूनच पिंपरी चिंचवड शहरात काका अजित पवार विरुद्ध पुतणे रोहित पवार असा सामना पहायला मिळणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. त्यातच आता या नव्या वादामुळे या गोष्टीवर शिक्कामोर्बत झाल्याचं म्हटलं जातय. 


अजित पवार काय म्हणाले ?


'अलीकडे काही मंडळी पिंपरी चिंचवडमध्ये येऊन, नको ते भाष्य करत आहेत.  पण या शहराचा कायापालट कोणी केला? प्राध्यापक रामकृष्ण मोरेंच्या नंतर माझ्याकडे शहराची जबाबदारी आली, त्यावेळी अनेक कठोर निर्णय घेऊन मी शहराला एका वेगळ्या उंचीवर नेहून ठेवलं. पण काही जण शहरात येऊन वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत', असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना फटकारलं आहे. 


रोहित पवारांनी काय म्हटलं होतं?


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यामध्ये अजित पवारांवर निशाणा साधला होता. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, 'पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांमुळेच अजित दादांचं महत्त्व वाढलं.' त्यांच्या याच वक्तव्यावर अजित पवार यांनी रोखठोक उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालं. 


1991 पूर्वी पिंपरी चिंचवडची धुरा शरद पवारांच्या हाती होती. नंतर शरद पवारांनीच या शहराची सूत्र पुतणे अजित पवारांच्या हाती दिली. अजित दादांनी ही शहरात एकहाती सत्ता काबीज करून बारामती खालोखाल पिंपरी चिंचवडला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनवला. पण आता पुलाखालून बरंच पाणी गेल्यानं शरद पवारांनी नातू रोहित पवारांवर पिंपरी चिंचवडची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळं यानिमित्ताने काका अजित पवार विरुद्ध पुतणे रोहित पवार असा सामना रंगलेला पाहायला मिळू शकतो. 


राज्यातील सत्तासंघर्षांनंतर पहिली निवडणूक ही लोकसभेची होणार आहे. त्यावेळी मावळ लोकसभेकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. अजित दादांचे पुत्र पार्थ पवार इथून पुन्हा एकदा स्वतःच नशीब अजमावू शकतात. तर स्थानिक नेत्यांना महापालिकेत सत्ता काबीज करायची आहे. अशात रोहित पवारांची जादू चालली तर काकांची डोकेदुखी वाढू शकते.


हेही वाचा :


Rohit Pawar : ताकदवान नेत्यांना कमकुवत करण्याचं भाजपचं आधीपासून राजकारण; रोहित पवारांचा हल्लाबोल