पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) म्हणतात तसं काहीही होत नाही. ते बॉम्ब फुटेल म्हणतात मात्र तसंही काही होत नाही, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, फडणवीस दरवेळी म्हणातात की यावेळी काहीतरी मोठं होईल, मोठा बॉम्ब फुटेल मात्र तसं कधीही होत नसतं. मात्र जेव्हा ते असंही बोलतात त्यावेळी काहीतरी नियोजित असण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले.
यावेळी बोलताना मराठा आरक्षणावरही त्यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की,16 टक्के आरक्षण द्यायचे असेल तर EWS साठी जसे घटना दुरुस्ती करून देण्यात आले होते तसं द्यावं. महाराष्ट्रात सगळ्या नेत्यांना एकत्र येऊन हे करायला हवे. संसदेत मुद्दे मांडले गेले पाहिजे. 16% आरक्षण घटना दुरुस्ती करून लगेच आरक्षण 100% दिलं जाऊ शकतं मात्र त्यासाठी सगळ्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे. समाजाला विश्वासात घेऊन, योग्य निर्णय घेता येतो, असंही ते म्हणाले. हा निर्णय जर कायमस्वरुपी काढायचा असेल आणि अन्याय न करता हा निर्णय घ्यायचा असेल तर आपल्याला घटनादुरुस्ती करावी लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजप ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत राजकारण करत आहेत. सोबतच धनगर आरक्षणाबाबातदेखील राजकारण करत आहे. अनेक प्रश्नांवर राज्यात टीका होते मात्र केंद्रात एखादा प्रश्न सोडणवण्याची संधी भाजपच्या अनेक खासदारांना आहे. एक इंजिन केंद्रात आणि तीन इंजिन राज्यात आहे. या सगळ्यांनी मिळून ठरवलं तर अनेक प्रश्न सोडवू शकतात आणि अनेकांना न्यायही देऊ शकतात, मात्र हे भाजपला करायचं नाही. भाजपला समाजासमाजात वाद निर्माण करायचा आहे आणि त्यातूनच ते राजकीय पोळी भाजत आहे, असा आरोपही त्यांनी सरकारवर केला आहे.
ललित पाटील प्रकरणाचा तपास नीट होणार नाही..
ललित पाटील प्रकरणाचा तपास नीट होणार नाही. यापूर्वीच्या अनेक तपासांचं काय झालं हे आपल्यातील अनेकांना माहिती आहे. जालन्यातील लाठीचार्ज कसा झाला?, कोणी केला? हा पण तपास असाच मागे पडला त्याच प्रमाणे ललित पाटील प्रकरणाचा तपासही असाच मागे पडणार आहे. मागील 30 वर्षांपासून हजारो तपास असेच सुरु आहे. त्यामुळे उगाच सरकारी माध्यमातून तपास कऱण्यापेक्षा न्यायालयीन चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
इतर महत्वाची बातमी-