पुणे : जगभरातील लेखक, संपादक, साहित्यिक यांची पेन इंटरनॅशनल ही प्रतिष्ठित संघटना आहे. पेन इंटरनॅशनल काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन पहिल्यांदाच भारतात भरणार आहे.

येत्या 25 ते 29 सप्टेंबर 2018 या कालावधीमध्ये पुण्यात हे अधिवेशन पार पडणार आहे. पेन इंटरनॅशनल काँग्रेससाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे इंटलेक्चयुल पार्टनर असणार आहे.

भारतातले विविध 400 भाषातज्ञ यामध्ये सहभागी होणार आहेत. यासंदर्भात विद्यापीठात कुलगुरु डॉ. नितिन करमळकर आणि ज्येष्ठ्य भाषातज्ञ डॉ. गणेश देवी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. याचवेळी विद्यापीठाच्या आवारात भाषावन उभारण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला.

भाषावनमध्ये 180 झाडं लावण्यात येतील आणि इथे जगभरातल्या सहा हजार भाषांमधली गाणी, गोष्टी आणि साहित्य त्या झाडांजवळ गेल्यावर अनुभवायला मिळेल.

जानेवारी 2019 पर्यंत भाषावनाचा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आहे. तर पेन इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये जगभरातले नामवंत लेखक आणि साहित्यिक सहभागी होणार आहेत. यादरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.