पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर पुण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अशातच आज पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पुण्यात (Pune Political News) पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, भाजपच्या अनेक नेत्यांना वेगवेगळ्या विधानसभांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. हा संघटनेचा दौरा आहे. 100 ते 150 पदाधिकारी बैठकीला असतील आणि त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. विधानसभेची ही पूर्व तयारी आहे. तर आता एका मतदारसंघात अनेक उमेदवार इच्छुक असतात त्यातून कसा मार्ग काढणार या प्रश्नावरतीही त्यांनी उत्तर दिलं आहे. 


चिंचवड विधानसभेत इच्छुकांची गर्दी मोठी आहे त्यातून कसा मार्ग काढणार? या प्रश्नावर उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रत्येकवेळी भाजप मार्ग काढतोच, आम्हाला इच्छुकांची यादीतून एकाचं नाव द्यावं लागतं. याची प्रॅक्टिस कोअर कमिटीला आहे, ते यातून तोडगा काढतील, असं त्यांनी (Pankaja Munde) म्हटलं आहे.


पिंपरी विधानसभा क्षेत्रात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी


पिंपरी विधानसभेत विद्यमान आमदार अण्णा बनसोडे हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्याचबरोबर सध्या भाजपात असलेल्या सीमा साळवे या अजित पवार गटाकडे पिंपरी विधानसभेची जागा मागण्याची शक्यता आहे. पिंपरी विधानसभा क्षेत्र हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, हा विधानसभा क्षेत्र जेवढा विकसित आहे. तेवढाच मागासलेला देखील आहे.


महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? 


महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? या प्रश्नावर बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या तुम्ही माझ्याकडून बातमी काढू नका, असं म्हणत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं आहे. 


चिंचवड विधानसभा भाजपचा बालेकिल्ला मात्र राष्ट्रवादीकडून दावेदारी


चिंचवड विधानसभा स्वर्गीय आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचा बालेकिल्ला मानला जायचा. त्यांच्या अकाली निधनानंतर चिंचवड विधानसभेत पोट निवडणूक झाली आणि त्या पोट निवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप ह्या आमदार म्हणून निवडून आल्या. कधीकाळी चिंचवड विधानसभा क्षेत्रात लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याने निवडून यायचे. मात्र त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपत प्रवेश केला होता, त्यानंतर चिंचवड विधानसभा क्षेत्र हा एक प्रकारे भाजपचा बालेकिल्ला झाला.


विधानसभा निवडणुकीत देखील नाना काटे हे अजित पवार गटाकडे चिंचवड विधानसभेची उमेदवारी मागण्याची शक्यता आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचे धाकटे बंधू शंकर पांडुरंग जगताप यांची चिंचवड विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून अश्विनी जगताप यांना परत विधानसभेची संधी दिली जाण्याच शक्यता आहे. त्याचबरोबर शंकर पांडुरंग जगताप यांनी देखील भाजपच्या तिकिटावर चिंचवड विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. महायुती सध्या अजित पवार देखील सहभागी असल्याने चिंचवड विधानसभा जागेवर अजित पवारांचा गट देखील दावेदारी करण्याची शक्यता आहे.