पुणे: आजपासून आषाढी वारीचा सोहळा सुरु होत आहे. त्यासाठी संपूर्ण देशभरातले वारकरी विठू नामाचा गजर करत सोहळ्यात दाखल होत आहेत. आज श्री क्षेत्र देहूहून संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. तर तिकडे पैठणहून एकनाथ महाराजांच्या पालखीचंही प्रस्तान होणार आहे.

प्लास्टिक बंदी नंतरची ही पहिलीच वारी आहे. त्यामुळे वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनीही प्लास्टिकला पर्याय म्हणून वेगवेगळ्या वस्तूंची जोड घेतली आहे.

दरम्यान संत तुकाराम महाराज पालखीसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही अकलूजहून डॉ. धवलसिंह मोहिते-पाटलांचा शौर्य घोडा देहूकडे रवाना झाला. पद्मजादेवी आणि त्यांचे पुत्र धवलसिंह मोहिते-पाटील यांनी पुजा करुन अश्वाला देहू प्रस्थानासाठी निरोप दिला.



वारीसाठी खास गाणं

पुढचे १५ दिवस देहू-आळंदीतून पंढरपूरकडे तहान, भूक विसरून वारकऱ्यांची पावलं चालू लागतील. आणि त्याअविरत चालणाऱ्या पावलांना सांगितीक ऊर्जा मिळणार आहे वारीच्या थीम साँगनं. ऐकायला काहीसं वेगळं वाटेल. पण मागील ८ वर्षांपासून फेसबुक दिंडी चालवणाऱ्या स्वप्नील मोरे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी यावर्षी खास वारीसाठी गाण्याची निर्मिती केली आहे.

ज्यांना वारीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही अशा ई वारकऱ्यांना फेसबुक दिंडी महत्वाची असते. बदलेल्या काळात वारीचं बदलत जाणारं रूप फेसबुक दिंडीनं यावर्षीच्या गाण्यातून मांडलं आहे. अमोल गावडे यांची निर्मिती, आदर्श शिंदे यांचा आवाज, तारा आराध्य यांचे शब्द आणि हर्ष राऊत, विजय कापसे, केदार दिवेकर यांच्या संगितानं सजलेल्या गाण्याची एक झलक आधी तुमच्यासाठी.