पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार 10 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली होती. यांनी हा आदेश दिला. त्यानुसार लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी शहरात सुरू होती. परंतु सलग पाच दिवस दुकाने बंद असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी एक दिवसाचा दिलासा दिला आहे.


रविवारी ( 19 जुलै) पुण्यात सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेले पाच दिवस पुण्यातील सर्व प्रकारची दुकानं बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळं उद्या खरेदीसाठी लोकांची गर्दी होऊ नये यासाठी दुकानं सुरू ठेवण्याची वेळ वाढवून देण्यात आली आहे. भाजीपाला, किराणा माल आणि चिकन- मटणची दुकानं आणि ठोक विक्री करणारी दुकानं सुरू ठेवण्यासाठी ही परवानगी महापालिकेने दिली आहे. सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतची ही मुभा उद्या फक्त रविवारपुरती असेल. सोमवारपासून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी दुकानांना पुन्हा वेळेची मर्यादा लागू होईल. उद्या आखाड महिन्याचा शेवटचा रविवार असल्याने लोकांकडून चिकन - मटणची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं खरेदी करताना लोकांनी गर्दी टाळणं आवश्यक आहे. महापालिकेकडून त्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.


पिंपरी- चिंचवडलाही दिलासा


पिंपरी चिंचवडमधील लॉकडाऊन आज रात्री 12 पासून शिथिल करण्यात येणार आहे. या दरम्यान अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी किराणा माल, भाजी विक्रेते आणि मटण-चिकन-मासे-अंडी विक्रेत्यांना मुभा देण्यात आली आहे. रविवारी (19 जुलै) म्हणजे उद्या गर्दी होईल म्हणून सकाळी 8 ते सायंकाळी 6 दरम्यान ही दुकानं खुली राहतील. तर 20 जुलै ते 23 जुलै दरम्यान सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंतच मुभा असेल.


संबंधित बातम्या :




Special Report | कोरोना रुग्णसंख्या वाढीत ठाणे पहिल्या तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर