मुंबई : कोरोना रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी. गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी लागणारी रेमडेसेवीर आणि टोसीलीझुमॅब औषधं आता बाजार भावापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होणार आहेत. पाच हजाराचं रेमडेसेवीर 4 हजारात आणि चाळीस हजारांचं टोसीलीझुमॅब 31 हजार रुपयांमध्ये विकण्याचा निर्णय मुंबईतील काही वितरकांनी घेतला आहे. यामध्ये ज्युपिटर फार्मसी, भायखळा फार्मसी, एस के एजन्सी घाटकोपर, मासिना आणि सैफी हॉस्पिटल फार्मसी यांचा सहभाग आहे.


या दोन्ही औषधाचा राज्यात तुटवडा होत असून काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. शिंगणे यांनी दोन्ही औषधांच्या उत्पादक व वितरक तसेच अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत उत्पादक व वितरक कंपन्यानी त्यांचे वितरक राज्यभरात वाढवावीत तसेच उत्पादन व आयात वाढवावी अशा सूचना डॉ. शिंगणे यांनी दिल्या आहेत.


रेमडेसीवर (Remdesivir 100 mg Inj) व टोसीलीझुमॅब (Tocilizumab Inj) या दोन औषधांचे उत्पादक / आयातदार फक्त दोनच कंपन्या आहेत. त्यांचे उत्पादन राज्याबाहेर होते. रेमडेसीवरचे उत्पादन हेटेरो हेल्थकेअर, हैद्राबाद येथे होते. तर सिपला कंपनी गोव्यात उत्पादन करते. टोसीलीझुमॅबची आयात रोश कंपनी करते तर सिपला ही कंपनी वितरण करते.


येत्या आठवडयात मे.मॉयलान ही कंपनी रेमडेसीवीर इंजेक्शन बाजारात आणणार आहे. तसेच मे.हेटेरो हेल्थकेअर, गुजरात येथील नवसारी येथे उत्पादन लवकरच सुरु करणार आहे. सिपला सुध्दा गुजरातमध्ये उत्पादन सुरु करण्याचा प्रयत्नात आहे. त्यामुळे वरील औषधांच्या पुरवठयात वाढ होणार आहे. मात्र या औषधाच्या काळाबाजारी बाबत काही माहिती असल्यास ती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर देण्यात यावी, असे आवाहनही डॉ. शिंगणे यांनी केले आहे.


एकीकडे कोरोनाच्या औषधांमध्ये मोठी नफेखोरी आणि काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत असतांना वितकरांच्या या निर्णयामुळे हजारो रुग्णांचे जीव वाचणार आहेत. तसेच राज्यातील इतर वितरकांनीही यांचा आदर्श घेतल्यास कोरोनाविरुद्धची लढाई आणखी सक्षमपणे लढता येईल.


संबंधित बातम्या :




Corona vaccine | कोरोनावरील Covaxin लसीच्या चाचणीला भारतात सुरुवात