पुणे : इयत्ता आठवीच्या मराठीच्या पुस्तकात राज्य शिक्षण प्रसारक मंडळाने चूक केल्याचा दावा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केला आहे. आठवीच्या मराठीच्या पुस्तकात इतिहासकार यदुनाथ थत्ते यांचा लेख छापण्यात आला आहे. यामध्ये भगतसिंग, राजगुरु आणि कुर्बान हुसेन हे इंग्रजाशी लढताना फासावर गेले असा उल्लेख आहे. यावर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने याला आक्षेप घेतला आहे. सुखदेव यांचं नाव वगळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ब्राह्मण महासंघाचे प्रमुख आनंद दवे यांनी केली आहे.


पुस्तकात उल्लेख काय?
आठवीच्या अभ्यासक्रमात प्रख्यात लेखक यदुनाथ थत्ते यांचा 'भारत माझा देश आहे' या धडा आहे. या धड्यात चूक झाल्याचं समोर आलं आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु हे तीन क्रांतिकारक फासावर गेल्याचं सगळ्यांनाच माहित आहे. परंतु या धड्यात सुखदेव यांच्याऐवीज कुरबान हुसेन यांचा उल्लेख केला आहे.



"देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र, दोघांवर प्रेम हवे, होय ना?"
"बरोबर आहे" मुले म्हणाली.
एक मुलगा म्हणाला, "भगतसिंह, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते"
मी विचारले "ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा? आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी…


यावर ब्राह्मण महासंघाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मराठीच्या पुस्तकातील ही चूक निंदनीय असून हे पुस्तक मागे घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असं आनंद दवे म्हणाले.


कुर्बान हुसेन कोण होते?
कुर्बान हुसेन हे सोलापूरच्या चार हुतात्म्यांपैकी एक आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने 9 ते 11 मे 1930 या काळात तीन दिवसांचं स्वातंत्र्य अनुभवलं. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान ब्रिटिशांनी मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन आणि किसन सारडा यांना 12 जानेवारी, 1931 रोजी सोलापूरमध्ये फाशी दिली.


हुतात्मा अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांचा जन्म फ्रेम मेकरचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबात झाला. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी ही त्यांची स्फूर्तिदैवतं होती. स्वातंत्र्य, स्वदेशी, समता, समाजवाद आणि हिंदू-मुस्लिम ऐक्‍य या पंचसूत्रीवर त्यांची निष्ठा होती. डॉ. कृ. भि. अंत्रोळीकरांच्या नेतृत्वाखाली सभा-संमेलन, मोर्चा, मिरवणुकांत ते सहभागी होत असल्याने आणि हिंदू-मुस्लिम ऐक्‍याची तळमळ त्यांच्या लेखणीत आणि वाणीत दिसून येत होती. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेच्या सुरुवातीच्या दिवशी 12 जानेवारी 1931 रोजी हसत हसत फासावर जाणाऱ्या चार हुतात्म्यांनी सोलापूर नगरीचे नाव स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात कोरलं आहे.


कुर्बान हुसेन यांच्याबाबत वेगळी भूमिका
दरम्यान कुर्बान हुसेन या सोलापुरच्या क्रांतिकारकांबाबत मात्र अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने वेगळी भूमिका घेतली आहे. कुर्बान हुसेन हे सोलापूरचे क्रांतिकारक इंग्रजाशी लढताना शहीद झाले होते, त्यामुळे त्यांचा इतिहास सोलापूरच्या इतिहासात समाविष्ट करावा, असं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने म्हटल आहे.


वर्षा गायकवाड यांचं स्पष्टीकरण
इयत्ता आठवीच्या भाषा पुस्तकात शहीद सुखदेव यांचे नाव वगळल्याने सुरु झालेल्या वादावर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 2018-19 साली प्रचलित कार्यपद्धतीनुसार मुख्य समन्वयक प्राची रवींद्र साठे यांच्या कार्यकाळात पुस्तकाची निर्मिती झाली आहे. तर ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि स्वातंत्र्यसैनिक यदुनाथ थत्ते यांच्या लेखातून हा पाठ्यक्रम समाविष्ट करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच इतिहासाच्या पुस्तकात सुखदेव यांचा उल्लेख असल्याचंही त्यांनी सांगितलं. "साधारण दहा वर्षानंतर पाठ्यक्रम बदलला जातो. मात्र लवकरच केंद्राची नवीन एज्युकेशन पॉलिसी येणार आहे, त्यानंतर NCRTE च्या माध्यमातून याविषयी राज्य सरकार निर्णय घेईल. तसंच सोलापूरच्या कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे, मलप्पा जनशेट्टी आणि किसन सारडा या चार हुतात्म्यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली आहे. त्यामुळे यात मुस्लीम आणि हिंदू असा भेद करणं चुकीचं आहे," असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.