पिंपरी चिंचवड : पतंगाच्या मांजामुळे जखमी होणाऱ्या घटनांनी मकरसंक्रांतीच्या तोंडावर अनेकांची चिंता वाढली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पतंगाच्या मांजामुळे आणखी एक व्यक्ती थोडक्यात बचावली. मांजामुळे ज्येष्ठ नागरिकाचा गळा कापता-कापता वाचलाय.


आधी तीन वर्षांचा चिमुकला हमजा खान आणि आता ज्येष्ठ नागरिक रंगनाथ भुजबळ, या दोघांचे प्राण थोडक्यात बचावले. मांजामुळे हमजाचा डोळा कापला गेला होता, त्याच्यावर बत्तीस टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. तर रंगनाथ यांचा गळा आणि हाताचे बोट कापता-कापता बचावले. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीवरील रस्त्यावर दुचाकीवरून निघाले असताना ही घटना घडली.

मकरसंक्रांतीची चाहूल लागताच पतंगप्रेमींचा सुळसुळाट पाहायला मिळतो. यात पतंग गुल करण्याची स्पर्धा लागते. पतंग गुल होताच मांजा तसाच सोडला जातो आणि यातूनच असे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे या मांजावरच बंदी घालावी, अशी मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे.

भारतात तयार होणारा मांजा हा घातक नसतो, पण चायनामेड मांजा हा तंगूसचा असतो. त्यामुळे त्याने शरीराचा कोणताही भाग कापला कापतो. यातून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

तंगूसच्या चायनामेड मांजावर बंदी असल्याने तो बाजारात भेटत नसल्याचे दाखले दिले जातात. मग पतंगप्रेमीना हा मांजा इतक्या सहजरित्या कुठून मिळतो, याचा शोध घेण्याची गरज आहे. अन्यथा हा चायनीज मांजा कुणाच्या तरी जीवावर बेतू शकतो.