Raj thackeray on pune metro : पुण्यात मेट्रोची (Pune metro) गरज काय? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी उपस्थित केला आहे. 2022 मध्ये पुणे मेट्रोचं उद्घाटन झालं मात्र पुणे (Pune) मेट्रो अजूनही कमी अंतर असलेल्या वनाज ते गरवारे याच मार्गावर धावत आहे. त्यात अनेकदा मेट्रो रिकामीच धावते. त्यामुळे त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. ते पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेत बोलत होते. 'नवं काहीतरी', असा त्यांच्या व्याख्यानमालेचा विषय होता. या व्याख्यानमालेत त्यांनी अनेक विषयांना हात घातला आहे.
ते म्हणाले, पुण्यात मेट्रोचं बांधकाम सुरु आहे. त्यात एक मार्ग सुरु झाला आहे. लांब पल्ल्यासाठी मेट्रोचा वापर केला जातो. त्यामुळे पुण्यात मेट्रोची गरज खरंच आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक शहराची वेगवेगळी मानसिकता असते. शहराचा वेग वेगळा असतो. त्या मानसिकतेप्रमाणे शहर घडवलं पाहिजे आणि त्या शहराची उभारणी केली पाहिजे. पुणे, नागपूर या शहराची मानसिकता मेट्रोची नसून ती दुचाकीने प्रवास करण्याची आहे. घरापासून निघून हव्या त्या ठिकाणावर थेट जाण्याची मानसिकता आहे. पुर्वीच्या काळात लोक जसे शेले बांधून घोड्यावर बसून प्रवास करायचे तसं पुण्यात चेहऱ्यावर शेला बांधून दुचाकीवरुन प्रवास करताना लोक दिसत आहे. ज्या शहरात ही मानसिकता आहे. त्या शहरात मेट्रोचा जीना चढून मेट्रोचा प्रवास लोक कसा करणार?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. ही मानसिकता बदलायला वेळ लागणार आहे. मात्र त्यापूर्वीच आपण मेट्रोसारख्या प्रोजेक्टवर बराच खर्च करुन ठेवतो, असंही ते म्हणाले.
खर्च करुनही मेट्रो रिकाम्या धावतात...
मेट्रो उभारणासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातो. त्यानंतर या मेट्रो रिकाम्या धावतात. शहराची मानसिकता पाहून शरहाची उभारणी केली पाहिजे. यात लोकांच्या प्रतिक्रिया आणि त्यांचं मत घेतलं पाहिजे. शहरात उपाययोजना करताना नागरिकांना कोणी विचारत नाही त्यामुळे नागरिक कोणाला विचारत नाही महत्वाचं म्हणजे आपल्याला प्रश्नच पडत नाही. त्यामुळे कोट्यावधीचा खर्च होतो, असंही ते म्हणाले.
नागरिक फक्त मतदानाला एकत्र येतात
प्रत्येक नागरिक फक्त मतदानाला एकत्र येतात. या नागरिकांचा दबावगट नाही. प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश करावा वाटत नाही. अनेक लोक सामाजिक काम करतात मात्र सामाजिक कामाला राजकीय धार येत नाही तोपर्यंत सामाजिक काम पुढे जाऊ शकत नाही. अनेकांना नवीन कल्पना सुचतात मात्र त्या घरात ठेऊन उपयोग नाही. स्वत: राजकारणात आल्याशिवाय स्वत:चं अस्तित्व उभं केल्याशिवाय काहीही घ़डणार नाही, असाही संदेश त्यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांना दिला आहे.