Sharad Pawar Jaikumar Gore : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली आहे. जयकुमार गोरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. 24 डिसेंबरला मध्यरात्री तीन वाजता फलटण तालुक्यातील मलठण येथे बाणगंगा नदीत कार कोसळून जयकुमार गोरे यांचा अपघात झाला. त्यानंतर त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. याच रुबी हॉल क्लिनिकमध्ये जाऊन शरद पवारांनी गोरेंची चौकशी केली आहे. 


पक्ष वेगळे असले आणि विरोधक असले तरी देखील प्रकृतीची विचारपूस करणं आणि संकटात एकमेकांची साथ देणं ही महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती आहे. देशात अनेकदा महाराष्ट्राच्या याच हटके राजकारणाची चर्चा होते. शरद पवारांनी गोरेंची घेतलेली भेट राज्यातील राजकारणाचं वेगळेपण जपते. 



 


साताऱ्यातील फलटणमध्ये अपघात, पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार


24 डिसेंबरला मध्यरात्री तीन वाजता फलटण तालुक्यातील मलठण येथे बाणगंगा नदीत कार कोसळून अपघात झाला. या अपघातात जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले होते. यांच्यासह त्यांचा ड्रायव्हर, स्वीय सहाय्यक आणि पोलीस सुरक्षारक्षक देखील होते. त्याचवेळी पहाटे जयकुमार गोरे यांना तातडीने पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन सहकाऱ्यांना बारामतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गोरे यांना मदत केली. त्यानंतर गोरे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. 


गिरीष बापटांचीही घेतली भेट


काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची दीनानाथ रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. शरद पवारांनी गिरीश बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यावेळी दोघांमध्ये बराचवेळ चर्चा झाली. या भेटीदरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या देखील उपस्थित होते. शरद पवार आणि गिरीश बापट यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहे. त्यांच्या मैत्रीच्या चर्चा राजकीय वर्तुळात नेहमी होते. या भेटीत शरद पवारांनी गिरीश बापटांना काळजी घेण्याचा सल्ला दिला. शिवाय लवकर बरे व्हा आणि संसदेत या वाट बघतोय, असंही पवार म्हणाले होते. 


किरीट सोमय्यांकडून कौतुक


शरद पवार यांचे एक वेगळे स्थान आहे. आम्ही त्यांचा नेहमीच आदर करतो. प्रत्येक राजकारणी अनेक चांगली कामं करत असतो. शरद पवारांनी देखील अनेक चांगली कामं केली आहेत. पक्ष जरी वेगळा असला किंवा कट्टर विरोधक असले तरी शरद पवार हे गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले होते. ज्या लोकांनी महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं आहे. त्यांचा मानसन्मान सगळे करत असतात. ही महाराष्ट्राचीच नाही तर हिंदुस्थानाची संस्कृती आहे. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारखं आहे, असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्यांनी पवारांचं कौतुक केलं होतं.