Maharashtra ATS: लष्कर-ए-तोयबा (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी संघटनेत सामिल असल्याचा संशयावरून पुणे दहशतवाद विरोधी पथकाने (Pune ATS) अटक केलेल्या दोन संशयितांची पुणे सत्र न्यायालयाने (Pune Court) जामिनावर सुटका केली. या आरोपींचा दहशतवादी संघटनेत सहभाग असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. एटीएसने अटक केलेल्या एका आरोपीचा मोठा भाऊ हा जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा बळी ठरला आहे. 


महाराष्ट्र एटीएसने जम्मू आणि काश्मीरमधील रहिवासी असलेल्या आफताब हुसेन अब्दुल जब्बार शाह आणि मोहम्मद युसूफ अत्तू यांना मे आणि जून महिन्यात सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याची योजना आखल्याबद्दल अटक करण्यात आली होती. पुणे एटीएसने या संशयित आरोपींविरोधात युएपीए कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला नव्हता. त्यांच्याविरोधात भादंवि 124(अ) आणि 153 बी या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


मोहम्मद जुनैदला एटीएसच्या अधिकाऱ्यांनी मे महिन्यात पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर त्याला अटक केली होती. जुनैद हा मुळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील राहणारा आहे. पुण्यात तो भंगाराचा व्यवसाय करत होता. त्याशिवाय, एटीएसने उत्तर प्रदेशातील इनामूल हक यालादेखील अटक केली होती. हक याआधी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असलेल्या प्रकरणात आधीच अटकेत आहे. 


कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले की,  आफताब आणि युसूफ यांचा जुनैदसोबत संबंध असल्याचे दिसून आले आहे. जुनैदने आफताबशी संपर्क साधला आणि त्यांच्या संभाषणात फरार आरोपी उमरचा उल्लेख आहे. मात्र, आफताब दहशतवादी कारवायांमध्ये किंवा दहशतवादी संघटनेत सामिल होता का,  याचा अंदाज या संभाषणावरून लावता येत नसल्याचे कोर्टाने म्हटले. युसूफने जुनैदच्या खात्यावर पैसे जमा केले होते. मात्र, पैसे हस्तांतर करण्यापूर्वी आणि त्यानंतर त्यांच्यात कोणतेही संभाषण झाले नाही. त्यामुळे युसूफने अन्य कोणाच्या तरी सांगण्यावरून जुनैदच्या खात्यात १० हजार रुपये ट्रान्सफर केले असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. 


युसूफचा कोणत्याही दहशतवादी कारवाया किंवा कोणत्याही देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा कोणताही पुरावा नाही. त्याचप्रमाणे, आफताब कोणत्याही दहशतवादी किंवा देशविरोधी कारवायांमध्ये सामील होता हे सांगणारा कोणताही पुरावा नसल्याचेही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले.


प्रकरण काय? 


एटीएसच्या दाव्यानुसार, जुनैद हा जम्मू-काश्मीरमधील हमीदुल्ला जरगर (प्रकरणातील फरार आरोपी) याच्या संपर्कात होता आणि तो अन्सार गजवातुल हिंद/तौहीद नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप चालवत होता. जरगर त्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये देशविरोधी आणि दहशतवादाशी संबंधित पोस्ट पाठवत असे आणि त्याच्या सूचनेनुसार जुनैदने भारतात लोकांना भरती केल्याचा आरोप आहे.


जुनैदने हिंदूंविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठी भारतात मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत फेसबुकवर पोस्ट केली असल्याचे एटीएसच्या सायबर सेलला आढळून आले. जुनैद आफताबच्या संपर्कात आला आणि त्यानंतर त्याने आफताबला बंदी घालण्यात आलेली  दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबामध्ये सामील होण्याची ऑफर दिली होती. आफताबने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जुनैदची उमर नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली आणि तो तंजीम (नवीन दहशतवादी गट) साठी भरती करत असल्याचे सांगितले, असा एटीएसचा दावा होता. 


आफताब आणि उमर भारतातील गर्दीच्या विविध ठिकाणी हिंसाचार घडवण्यासाठी जुनैदला स्फोटके आणि शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणासाठी काश्मीरमध्ये बोलावत होते. आफताब आणि उमर यांनी प्रशिक्षणासाठी जम्मू-काश्मीरमध्ये येण्यासाठी युसूफमार्फत जुनैदच्या नवीन बँक खात्यात 10,000 रुपये ट्रान्सफर केले. उमरच्या सांगण्यावरून जुनैदने नवीन फेसबुक आणि व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यासाठी अनेक सिमकार्ड खरेदी केले होते असा एटीएसने दावा केला होता.