पुणे: निखील वागळे (Nikhil Wagle) हा कुणी पत्रकार नाही, तो स्वस्तात परत गेला, पुणे भाजपचं काम अपूरं असून त्यांनी ते पूर्ण करावं, नाहीतर मला बोलवा अशी उघड धमकी भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांनी दिली आहे. नितेश राणे यांनी काहीच दिवसांपूर्वी त्यांच्यावर संघाचे संस्कार असून वैयक्तिक टीका करणार नसल्याचं सांगितलं होतं. आता त्यांनी थेट उघड धमकी दिली आहे. 


ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांचा एकेरी उल्लेख करत नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली. नितेश राणे म्हणाले की, निखिल वागळे हा कुठलाही पत्रकार नाही. त्याला पत्रकार म्हणून तुम्ही स्वतःचा अपमान करून घेऊ नका. ती विकृती आहे. तो फार स्वस्तात वापस गेला. पुणे भाजपाचे काम अपूर्ण राहिलं आहे, काम पूर्ण करा. नाहीतर मला बोलून घ्या, ते पूर्ण आपण करू. 


निखील वागळेंची टीका आणि नितेश राणेंची धमकी


भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अडवाणी यांच्यावर निखील वागळे यांनी टीका केली होती. त्यानंतर पुण्यातील निर्भय बनो या कार्यक्रमात जाताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी निखील वागळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यामध्ये निखील वागळे यांची गाडीही फोडण्यात आली होती.


पुण्यातील त्या घडलेल्या प्रकारावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वक्तव्य करत निखील वागळे यांना थेट धमकीच दिल्याचं दिसून येतंय. पुणे भाजपचं ते काम अपुरं असून त्यांनी ते पूर्ण करावं, नसेल तर मला बोलवा, आपण ते पूर्ण करू असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय. 


संघाचं संस्कार असल्याचा नितेश राणेंचा दावा


माझ्यावर संघाचे विचार आणि संस्कार आलेले आहेत, मी मोठ्या प्रमाणात संघाच्या विचारांची पुस्तकं वाचतो, असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं होतं. त्यानंतर लगेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली होती. शरद पवारांच्या निष्ठावंत कुत्र्याने जास्त भुंकू नये, नाहीतर नसबंदी करावी लागेल असं त्यांनी वक्तव्य केलं होतं.


उद्धव ठाकरे जेलमध्ये खडी फोडायला जाणार 


उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना आमचं सांगणं आहे की तू 2024 ओलांडून बघ. आम्ही 400 ओलांडणार आहोत, तू मातोश्री राहतो की आर्थर रोड जेलमध्ये खडी फोडायला जातो ते बघू. आमची चिंता करण्याऐवजी स्वतःची आणि स्वतःच्या मुलाची चिंता करा. 


ही बातमी वाचा: