पुणे : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने अपिरिमीत हाणी झाली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील तर एका गावाचं छप्परच या वादळाने हिरावून घेतलं आहे.


बुधवारी आलेल्या वादळात मुळशी तालुक्यातील भांबर्डे हे गाव अक्षरश: उघडं पडलं आहे. अवघं 150 घरं असणाऱ्या या गावातील 5-6 घरं वगळता बाकीच्या घरांवरचे छप्पर उडून गेले आहेत आणि घरांची पडझड झाली आहे. भांबर्डे गावातील गावकरी सध्या गावातील मंदीरामध्ये आसरा घेऊन राहत आहेत.


“गावात फक्त 5-6 घरं अशी आहेत ज्यांमध्ये राहू शकतो. पण बाकीच्या सगळ्या घरांचं नुकसान झालं आहे. पडझड छप्पर उडाल्यामुळे त्या घरांमध्ये राहणं शक्य नाही. त्यामुळे गावातील लोक हे मंदिराच्या आवारात आसरा घेऊन राहत आहेत.” अशी माहिती भांबर्डे गावातील रहिवासी मारुती सुरुसे यांनी दिली. गावाकडे जाफारसे रस्तेही झाडं पडून बंद झाले आहेत.



“गेले 3 दिवस आम्ही फक्त भातच खातोय. वीजच नाही तर पीठ कुठून आणणार? गावात वीज नाही तर घरं कशी दुरुस्त करणार? वीज येणं खूप आवश्यक आहे. पण या भागातील सगळे पोल वादळाच्या तडाख्यात पडले आहेत. मोबाईल टॉवरही कोसळले आहेत त्यामुळे नेटवर्कही नाही,” मारुती सुरुसे यांनी ही माहीती दिली. मारुती सुरुसे हे मार्ग काढत पुण्यात येऊ शकले त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला आहे.


या भागातील तांदूळ हे प्रमुख पीक आहे. भाताची पेरणीही झाली होती. पण आता वादळाने हे सगळं मातीमोल झालं आहे. वर्षातून एकदा घेतलं जाणारं हे पीकही हातातून गेल्यामुळे भांबर्डे गावाचे रहिवासी हवालदिल झाले आहेत.



पण सध्या मात्र या संपुर्ण गावाची राहण्याची दुरावस्था झाली आहे. “गावाला तात्काळ मदतीची गरज आहे. गावात खूप अवस्था आहे,” मारुती सुरुसे यांनी भावना व्यक्त केल्या.त्यामुळे शासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.



संबंधित बातम्या :







 WEB EXCLUSIVE| निसर्ग'चा धुमाकूळ सुरु असतानाच देविकाची प्रसुती; रायगडच्या हरिहरेश्वरमधील थरारक कहाणी