नाशिक : निसर्ग वादळाचा तडाखा नाशिक जिल्ह्यालाही चांगलाच बसला असून बुधवारी संध्याकाळी वादळी वारा, ढगांच्या गडगडाटासह तुफान पावसाने नाशिक हादरुन गेलं होतं. एकामागे एक अनेक झाडे कोसळत होती, काही झाडांच्या फांद्या घरांवर जाऊन पडत होत्या तर काही थेट विजेच्या तारांवर आणि याचाच परिणाम म्हणून बुधवारपासून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.
नाशिक शहरातील शिखरेवाडी परिसरात एका विजेच्या खांबावर अचानक एक भला मोठा वृक्ष उन्मळून पडलं. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने शिखरेवाडी परिसरातील हजारो नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. मुलांना अभ्यासात अडचणी येत असून साधा मोबाईलही चार्ज करता येत नाही. रात्रही अंधारात काढावी लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. महावितरणने तात्काळ काम पूर्ण करावीत, अशी मागणी या परिसरातील रहिवासी करत आहेत.
महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रीजपालसिंह जनवीर यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार आधीच कोरोनाचा धोका आणि आता धडकून गेलेल्या निसर्ग वादळामुळे महावितरणला सध्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. वादळाचा नाशिक परिमंडळातील (नाशिक आणि नगर जिल्हा) 119 सबस्टेशनला फटका बसला असून तब्बल 2,552 विद्युत खांब कोसळले आहेत, यामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे. शुक्रवारी (5 जून) संध्याकाळपर्यंत 10 लाख ग्राहकांपैकी 8 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.
आपला जीव धोक्यात घालून महावितरणचे कर्मचारी सध्या काम करत असून सर्व परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर आमचे प्रयत्न सुरु आहेत. लॉकडाऊनमुळे आधीच महावितरण मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. ग्राहकांकडे पैसाच नाही, त्यातच महावितरणनेही सुरक्षेच्या कारणास्तव वसुली मोहीम बंद केली आहे. त्यामुळे मार्च महिन्यात 90 टक्के तर एप्रिलमध्ये आमचे फक्त 40 ते 45 टक्केच टारगेट पूर्ण झाले आहे. महिन्याला नाशिक महामंडळाची सरासरी 450 कोटी एवढी वसुली होत असते.
एकट्या नाशिकमध्येच नाही तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी महावितरणला वादळाचा जोरदार शॉक बसला असून रायगड आणि कोकणपट्ट्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे. खरं पाहिलं तर महावितरणचे सर्व कर्मचारी हे देखील योद्धेच आहेत. कोरोनाविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून तेही लढा देत आहेत. कोरोनाबाबत सर्व खबरदारी घेत ऊन असो पाऊस असो किंवा वादळ ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. आता निसर्ग वादळामुळे उद्भववलेली परिस्थितीही पूर्ववत करण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांनीही या सर्व गोष्टीचा विचार करत महावितरणला सहकार्य करण्याची सध्या गरज आहे.