पुणे : पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग अखेर आजपासून सुरु झाली आहे. लॉकडाऊनच्या नियमानुसार सकाळी दहा वाजता तुळशीबागमधील दुकानं उघडली. पुणे महापालिकेकडून तुळशीबागमधील व्यावसायिकांना पी1, पी2 च्या धर्तीवर दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. आज (5 जून) पी1 बाजूची दुकानं उघडण्यात येतील. सुरुवातीला 50 दुकानं आणि 50 स्टॉल उघडण्याचा प्रस्ताव होता. पण आता पी1 बाजूची सगळी दुकानं उघडण्याची परवानगी मिळाली आहे.
पुण्यातलं खरेदीसाठीचं सगळ्यांचं आवडतं ठिकाण म्हणजे तुळशीबाग. पण कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे पुण्यातील तुळशीबागही निर्मनुष्य झाली होती. लॉकडाऊनच्या टप्प्याटप्प्यांमध्ये नियम शिथिल झाले आणि काही भागातील दुकानं सुरु झाली. पण तुळशीबाग कधी सुरु होणार हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात होता. अनलॉक 1.0 मध्ये लॉकडाऊनच्या अनेक नियमांना शिथिलता मिळाल्यामुळे तुळशीबाग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तुळशीबाग व्यापारी संघटनेने दिलेल्या प्रस्तावाचा विचार करुन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी 30 मे रोजी तुळशीबागेची पाहणी केली. त्यानंतर प्रस्तावाला मंजुरी मिळाली. अखेर तुळशीबागेतील 50 टक्के दुकानं सुरु करण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर सुमारे अडीच महिन्यांनी तुळशीबाग पुन्हा सुरु झाली आहे.
वाहन पार्किंगबाबत वापरला जाणारा पी1 पी2 (एका दिवशी एक संपूर्ण बाजू आणि दुसऱ्या दिवशी दुसरी संपूर्ण बाजू) हा फॉर्म्युला तुळशीबागेतील दुकानांसाठी वापरण्यात येणार आहे. शिवाय जे फेरीवाले बसतील त्यांच्यात पाच मीटरचं अंतर राहणार आहे.
Unlock 1.0 | नियम आणि अटींसह तुळशीबागेतील दुकानं आजपासून सुरु