पुणे : पुण्यातील असून शासकीय रुग्णालयात पुण्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या शहरांमधील कोरोना रुग्णांनाही उपचारांसाठी आणले जात आहे. त्यापैकी अनेक रुग्ण ससूनला पोहोचण्याआधीच मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळं ससूनच्या नावावर मृत्यू देखील जास्त नोंद होत आहेत. दुसरीकडे सतत वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे इथल्या यंत्रणेवर ताण दिवसेंदिवस वाढत चालला. मात्र या कशामुळेही निराश न होता इथले डॉक्टर्स रुग्णांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे.
पुण्यात ज्या रुग्णाला कुठेच जागा मिळत नाही त्या रुग्णाला एकमेव आशा असते ती ससून शासकीय रुग्णालयात उपचार मिळण्याची. त्यामुळं ज्याचं कोणीच नसतं त्याची जबाबदारी ससून रुग्णालय घेतं असं पुण्यात म्हटलं जातं. कोरोनाच्या या संकटकाळात हे डेव्हिड ससून रुग्णालय आपल्या या लौकिकाला साजेसं असच काम करतंय. कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यात रुग्णांचा सर्वाधिक ओघ सुरु आहे तो या ससून रुग्णालयात आहे.
- ससून रुग्णालयातून आजपर्यंत 3781 रुग्ण बरे होऊन बाहेर पडलेत.
- सध्या या रुग्णालयात 525 कोरोना रुग्नांवर उपचार सुरु असून त्यापैकी 87 रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय.
- ससून रुग्णालयात आतापर्यंत 2588 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 416 रुग्ण हे मृतावस्थेतच ससूनला आणण्यात आले होते
- एकाच हॉस्पिटलच्या नावावर नोंद झालेले हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक कोरोना मृत्यू ठरावेत.
- मात्र या अशा परिस्थितही ससूनचे डॉक्टर्स अहोरात्र रुग्नांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत .
ससून रुग्णालयात ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आणि इतर सुविधांमध्ये कितीही वाढ केली तरी सध्याच्या रुग्णवाढीला ती पुरेसं ठरणं अशक्य आहे. त्यामुळं सतत वाढत जाणाऱ्या मृत्यूंचा ताण आणि काही वेळा रुग्णांच्या नातेवाईकांच्या नाराजीचा सामनाही इथल्या कर्मचाऱ्यांना करावा लागतोय. मात्र तरीही युध्दपातळीवर त्यांच काम सुरुच रहातं.
राज्यात सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद या ससून रुग्णालयात होत असल्यानं ससूनला टीकेचे धनीही व्हावं लागतंय. परंतु इथं अनेक रुग्ण अगदी गंभीर झाल्यावर किंवा इतर रुग्णालयात त्यांना पुढं उपचार मिळणं अशक्य झाल्यावर इथं येतात त्यामुळे इथला मृत्यूचा आकडा जास्त दिसतो असं इथल्या प्रशासनाच म्हणणे आहे. या ससूनमधून बरे होऊन बाहेर पडणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही तेवढंच मोठं आहे. अशा रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान इथल्या स्टाफसाठी टॉनिक म्हणून काम करतं.
डेव्हिड ससून या ज्यू उद्योजकाने एकोणिसाव्या शतकात केलेल्या आर्थिक मदतीतून हे रुग्णालय उभं राहिलं. 1867 ला या रुग्णालयाची सुरुवात झाल्यापासून ससूनने 1896 चा प्लेग असेल, 1918 चा स्पॅनिश फ्लू असेल किंवा त्यानंतर आलेले कॉलरा, सारी, स्वाईन फ्लू , इबोला यासारख्या आजारांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे . मात्र यावेळी कोरोनाने निर्माण झालेली परिस्थिती त्याहून वेगळी बनली आहे. एककीकडे रुग्णांची चाचण्या करण्यासाठी आणि उपचारांसाठीची रांग तर दुसरीकडे मृतदेहांची रांग अशा परिस्थितीत सध्या ससूनमधे कोरोनाशी लढाई सुरुय.
मागील दिडशे वर्षांच्या इतिहासात ससूनने साथीचे अनेक आजार पाहिलेत. मग तो 1896 - 97 चा प्लेग असेल, 1918चा स्पॅनिश फ्लू असेल किंवा त्यानंतरचे साथीचे इतर आजार. मात्र यावेळची परिस्थिती ससूनसाठी देखील न भुतो न भविष्यति अशी आहे. त्यामुळे प्रचंड ताण इथल्या व्यवस्थेवर आणि काम करणाऱ्यांवर पडतोय. यातुन शिकायचं आहे ते हेच की वर्षानुवर्षे ज्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आले ती व्यवस्था आता तरी सक्षम करण्याची गरज आहे.