Pune News : शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) वारंवार उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका करत आहेत. पण आता शिवतारेंना समज द्या, अन्यथा मावळ लोकसभेत (Maval Lok Sabha Constituency) शिंदे गटाकडून दिल्या जाणाऱ्या उमेदवाराचा प्रचार पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस करणार नाही. मावळ लोकसभेत महायुतीचा धर्म पाळणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देण्यात आला आहे.
अजित पवार गटाच्या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपावरून चर्चा सुरु आहेत. अजून काही ठिकाणी उमेदवार निश्चित झालेले नाहीत. बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) आमच्या पक्षाच्या वतीने जोरात प्रचार सुरु आहे. मात्र माजी आमदार विजय शिवतारे हे अतिशय चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत.
आमच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप
सुरुवातीला त्यांनी वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांना बोलावून घेतले. मात्र त्यानंतरही त्यांची बेताल वक्तव्य सुरूच आहेत. उद्या जर त्यांच्या पक्षाचा उमेदवार आमच्या मतदारसंघात दिला गेला तर त्यांचा प्रचार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आम्ही करणार नाही. कारण शिवतारे जे बोलत आहे. त्या बाबत आमच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे.
...तर शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणार
राष्ट्रवादी काँग्रेसचा मावळच्या जागेवर दावा आहे. परंतु, महायुतीत ही जागा शिवसेनेला (Shiv Sena) सुटली आणि शिवतारे यांची अशीच भूमिका राहिली. तर, मावळमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणार आहोत. शिवतारे यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची माफी मागावी. जोपर्यंत माफी मागत नाहीत. तोपर्यंत आम्ही मावळमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला.
बारामतीत आमचा उमेदवार निवडून येणार
शिवतारे यांनी माफी मागितल्यास मावळमध्ये युतीचा धर्म पाळला जाईल. बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहे. त्यांनी बारामतीत मोठी विकासकामे केली आहेत. त्यामुळे बारामतीत आमचा उमेदवार निवडून येईल, याची आम्हाला खात्री आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या