पुणे : संभाजी बिडीचं नाव अखेर बदलण्यात येणार आहे. या बिडीचं उत्पादन करणाऱ्या साबळे-वाघिरे ग्रुपने हा निर्णय घेतला आहे. मात्र नाव बदलण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. शिवधर्म फाऊंडेशन, इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करुन आम्ही बिडीचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे, असं साबळे-वाघिरे आणि कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी सांगितलं.


संभाजी बिडीचे नाव बदलावं या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून शिवधर्म फाउंडेशन आणि काही राजकीय संघटनांनी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला आंदोलन सुरु केलं होतं. त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून संभाजी बिडीचं नाव बदलण्याचा निर्णय साबळे-वाघिरे कंपनीने घेतला आहे. दिपकअण्णा काटे हा कार्यकर्ता या मागणीसाठी उपोषणाला बसला होता.



तर बिडी उत्पादनासाठी संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करु नका, असं आमदार रोहित पवार यांनीही म्हटलं होतं. चार दिवसांपूर्वी त्यांनी याबाबत ट्वीट केलं होतं. ते म्हणाले होते की, "छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी उत्पादन करतेय. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे. लोकभावनेचा विचार करुन संबंधित कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा."





हे नाव बदलण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागेल असे साबळे वाघिरे आणि कंपनीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. कंपनी आपल्या उत्पादनासाठी नवीन नाव कायदेशीर रजिस्टर करणार आहे. जेणेकरुन हे नवीन नाव आम्हाला आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल. त्यामुळे आमचा ग्राहकांची साखळी तुटणार नाही. तसंच शिवप्रेमींची मागणीही पूर्ण होईल आणि 60 ते 70 हजार विडी कामगारांच्या प्रपंचावर ही कुऱ्हाड येणार नाही, असं कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.