पुणे : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोट्यवधींची रक्कम उभी करणाऱ्या अभिनेते मकरंद अनासपुरे आणि अभिनेते नाना पाटेकर यांची ‘नाम फाऊंडेशन’ आता शहीज जवानांच्या कुटुंबांना मदत करणार आहे. येत्या 10 एप्रिलला राज्यातील 20 शहीद जवानांच्या कुटुंबांना प्रत्येकी अडीच लाख रुपये मदत केली जाणार आहे.


विशेष म्हणजे अभिनेते नाना पाटेकर हे स्वत: ही रक्कम देणार आहेत. ‘नाम’चे संस्थापक अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी पुण्यात यासंदर्भात माहिती दिली.

“शेतकरी आणि जवानांसाठी काम करणं हाच ‘नाम’च्या स्थापनेचा उद्देश आहे. शेतकऱ्यांसाठी थोडं काम झाल्यावर आता जवानांसाठीच्या कामाकडे वळत आहोत, हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रापुरता नाही, देशभरात हा कार्यक्रम होईल.”, असं अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी स्पष्ट केलं.

“शेतकऱ्यांचा फुटबॉल करु नका.”

शेतकऱ्यांचा फुटबॉल करु नका, असं म्हणत मकरंद अनासपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं हा तात्पुरता उपाय आहे. पण कायमस्वरुपी त्यांना न्याय देणं महत्त्वाचं आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्याच पाहिजेत. जास्त गोडाऊन्स हवीत.”

“शेतकऱ्याची अवस्था आईसारखी

“संशोधनावर आधारित शेतीला प्राधान्य द्या. शेतकऱ्याची अवस्था आईसारखी. सगळ्यांना खायला घालायचं आणि स्वत: उपाशी रहायचं. डॉक्टर संपावर गेले तर शेकडो रुग्णांचा मृत्यू झाला. शेतकरी संपावर गेले तर काय होईल? शेतकरी आत्महत्या करतात, पण कृषीमाल विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं ऐकलंय का?” असा सवाल ही यावेळी मकरंद यांनी केला.