Pune Crime news : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, (crime) आरोपी पती हत्येनंतर फरार, ओळख लपवण्यासाठी नाव बदललं, दुसरा विवाह करून वेगवेगळ्या गावात राहिला पण तब्बल 28 वर्षांनी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. एखाद्या चित्रपटाची वाटणारी ही कथा पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) प्रत्यक्षात घडली आहे.
1 फेब्रुवारी 1995ला सुशीला कांबळे यांची पिंपरी चिंचवडमध्ये हत्या झाली होती. पती रामा कांबळे हत्या करुन पसार झाला होता. मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील कोळनूर पांढरी या गावचा. तिथे पुणे पोलीस बरेच दिवस सापळा रचून बसले होते. पण तो पोलिसांच्या हाती लागलाच नाही. काही महिन्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष झालं. येत्या 1 फेब्रुवारीला या हत्येला 28 वर्ष पूर्ण होणार होती. दरम्यान महेश कांबळे नामक इसमावर 354 चा गुन्हा दाखल झाला आणि तो रामा कांबळेच्या कोळनूर पांढरी गावचा निघाला. त्यामुळे महेशच्या शोधात असणाऱ्या पोलिसांना रामा ही फरार असल्याचं लक्षात आलं. तेंव्हा सुशीला कांबळेच्या हत्येचा तपासाची चक्र पुन्हा फिरली.
ओळख लपवण्यासाठी नाव बदललं
गावात चौकशी केली असता, रामाने ओळख लपवण्यासाठी नाव बदलल्याची माहिती समोर आली. तो गावात कधीतरी येत असतो आणि त्याने सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील पालापूर गावातील महिलेशी दुसरा विवाह केल्याची तुटपुंजी खबर पोलिसांच्या हाती लागली. याच माहितीच्या बळावर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस पालापूरमध्ये पोहोचले, तिथे गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यात रामा कांबळे नव्हे तर राम बनसोडे नावाने वावरत असून त्याचं सध्याचं वय हे 66 वर्ष असल्याचं समोर आलं. पण रामा तिथेही राहत नसून राज्यातील वेगवेगळ्या गावात जाऊन मजुरी करत असल्याची माहिती हाती लागली.
आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्रही रामा बनसोडे नावाचं
विशेष म्हणजे रामा सध्या पुणे जिल्ह्यातच असल्याचं आणि मावळ तालुक्यातील वीट भट्टीवर काम करत असल्याचं पोलिसांना समजलं. मग पोलिसांनी तातडीने तिथे पथक पाठवलं. अनेक वीट भट्ट्यांवर जाऊन पाहिलं असता उर्से गावातील एका वीट भट्टीवर रामा बनसोडे आढळला. आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र ही रामा बनसोडे नावाचं असल्याने आणि अठ्ठावीस वर्षानंतर चेहऱ्यात झालेला बदल यामुळे ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. मग शेवटी नातेवाईकांना बोलावून ओळख पटवून पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेने रामा कांबळेचं बिंग फोडलं आणि बेड्या ठोकल्या.