Pune Metro News : पुण्यातील (Pune) बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या (Bundgarden Police Station) परिसरातून पुणे मेट्रोच्या (Pune Metro) साहित्याच्या चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या लोखंडी कंटेनरमधून अज्ञात चोरट्याने एक लाख 42 रुपये किमतीचे साहित्य चोरुन नेले आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अगमपाल सुरजित सिंग धूपर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

कोणत्या साहित्याची झाली चोरी?

बंडगार्डन मेट्रो स्टेशन या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोखंडी कंटेनर स्टोअरचे लॉक तोडून दहा इलेक्ट्रिक वायरचे बंडल, एक वेल्डिंग मशीन, तांब्याचे 16 लाइटनिंग अरेस्टर, दोन बटरफ्लाय, तांब्याचे पाईप्स, कटर मशीन, ड्रिल मशीन असा एकूण एक लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. कोणत्या कारणामुळे ही चोरी केली आहे याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. 

पहिल्यांदाच पुणे मेट्रोच्या साहित्याची चोरी 

पुणे शहरात मागील काही वर्षांपासून मेट्रोचं काम सुरु आहे. काही मार्गावर मेट्रो सुरु देखील झाली आहे. मात्र विविध परिसरातील काम अजूनही युद्धपातळीवर सुरु आहे. डेक्कन, मंडई, शिवाजी नगर, विमाननगर, येरवडा, बंड गार्डन, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, वाकड या सगळ्या परिसरात पुणे मेट्रोचं काम सुरु आहे. येत्या काही महिन्यात भुयारीमार्गावर देखील मेट्रो धावणार आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या मेट्रोच्या कामात कधीही चोरीची घटना घडली नाही. पहिल्यांदाच पुणे मेट्रोच्या साहित्याची चोरी झाल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

मेट्रोचं एकूण अंतर  33 किलोमीटर आणि 11,420 कोटी रुपये खर्च

पुणे मेट्रोसाठी एकूण 11,420 कोटी रुपये खर्च येणार आहे. मेट्रोचे एकूण अंतर हे 33 किलोमीटर आहे. यात 10 किलोमीटर अंतर हे भूमिगत तर 27 किलोमीटर एलिव्हेटेड मार्ग असणार आहे. पुण्यात वनाज ते गरवारे हा पहिला टप्पा सध्या सुरु करण्यात आला आहे. या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी वनाज ते डेक्कन या मार्गावर मेट्रोचाचणी करण्यात आली होती. ती चाचणी यशस्वी ठरली आहे. आता वनाज ते रामवाडी तसेच स्वारगेट ते पिंपरी हे मेट्रोचे काम जलद गतीने सुरू आहे.