पिंपरी चिंचवड : रात्रभर टीव्ही सुरू ठेऊन का झोपलीस? या कारणावरून पतीने पत्नीचा गळा घोटला आहे. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पुण्याच्या मावळ तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. पत्नीच्या पोटी मुलगी जन्मल्याची देखील या घटनेला किनार आहे. बापाच्या या दुष्कृत्याने सहा महिन्यांच्या चिमुरडीवर अनाथ होण्याची वेळ आलीये. चांदखेड येथील चांगुणा जाधव असं मृत महिलेचं तर आरोपी पतीचे योगेश जाधव असं नाव आहे.
साधारण दीड वर्षांपूर्वी चांगुणा आणि योगेश विवाह बंधनात अडकले. संसार अगदी गुण्यागोविंदाने सुरू होता. अशातच चांगुणा गरोदर असल्याची गोड बातमी समजताच जाधव कुटुंबात आनंद द्विगुणित झाला. पण पती योगेश बुरसटलेल्या विचारांचा असल्याचा अनुभव त्यानंतर पत्नी चांगुणाला येऊ लागला. कारण वंशाला दिवा हवा असा अट्टाहास योगेशचा होता. हे ऐकून चांगुणा हबकली होती. कारण मुलगा जन्मणार की मुलगी हे कोणाच्याच हातात नसतं पूर्णतः अवगत असलेल्या चांगुणाला यावर कसं रिऍक्ट व्हायचं याचं उत्तर अवगत नव्हतं. येणारा दिवस ती पुढं ढकलत होती. बाळ जन्मणार म्हटल्यावर प्रत्येक आईसाठी एक उत्सुकता असते. कारण नऊ महिने पोटात वाढवलेलं मूल की मुलगी, या विचारा पलीकडे तिची बाळाशी जुळलेली नाळ हे नातं तिच्यासाठी महत्वाचं होतं.
पण पती वंशाच्या दिव्यावर अडल्याने तिच्या मनात डिलिव्हरीची जणू भीतीच होती. अन् ती घटिका जवळ आली अन मुलगी जन्मल्याची बातमी येऊन धडकली. आई म्हणून चांगुणाला आनंद होताच पण त्याहून अधिक मूल न झाल्याची भीती होती. तिची भीती सार्थ होती, पती योगेश यामुळं खवळला होता. सुखी संसारात मुलगी झाल्याच्या बातमीने जणू विघ्नच आणलं होतं. योगेशचे जुने विचार कारणीभूत होते. कारण त्यापुढे पत्नी चांगुणावर तो रागावण्याची आणि भांडणाची एक ही संधी सोडत नव्हता.
अशात काल रात्रभर पत्नी चांगुणाकडून टीव्ही सुरूच राहिला. पहाटे उठला तेव्हा योगेशच्या निदर्शनास ही बाब पडली. मग मिळालेल्या कारणावरून त्याने पुन्हा वाद छेडला. यातूनच योगेश थेट छाताडावर बसला अन् तिचा गळा घोटून जीव घेतला. आई देवाघरी अन् बाप तुरुंगात गेल्याने सहा महिन्यांची चिमुरडीवर अनाथ होण्याची वेळ आलीय. पिंपरी चिंचवड पोलिसांनी योगेशला बेड्या ठोकल्या नंतर बाळाला चांगुणाच्या आईकडे देण्यात आलं.