Mumbai- Pune Accident:  मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा एक भीषण अपघात झाला. कारनं ट्रकला धडक दिल्यानं तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. कार मुंबईहून पुण्याकडे जात होती. उर्से टोलनाक्याजवळ कारनं ट्रकला मागून धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की अर्धी कार ट्रकखाली गेली. यामुळे कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

  


मुंबईहून पुण्याच्या दिशेने ही कार जात होती, त्याचवेळी उर्से गावच्या परिसरात समोरच्या ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती त्यातील चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. महामार्ग पोलिसांनी यंत्रणांच्या मदतीने यातील वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. 


महामार्गावरील  सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर


मुंबई आणि पुणे या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा हा मार्ग सुसाट गतीने धावतो. मात्र त्याच तुलनेत या मार्गावर अपघाताची मालिकादेखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. अनेकदा मोठ-मोठ्या अपघातांमुळे या मार्गावर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकांची कुटुंब उध्वस्त झाली आहेत. मात्र तरीही योग्य सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. अपघाताचं सत्र कधी संपणार हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारला जात आहे. विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूनंतर या महामार्गाच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर विरोधकांनी यावरुन गदारोळही केला. त्यानंतर सरकारने तात्काळ पावले उचलत इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरु करण्याचा निर्णय घेतला. 340 कोटींचा हा प्रकल्प असेल. यातील 115 कोटी उभारणी साठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत. 


रत्नागिरी आंजणारी घाटात टँकर पलटी


रत्नागिरी आंजणारी घाटात टँकर पलटी झाला. या अपघातमध्ये चालक गंभीर जखमी झाला आहे.  टँकरमधून ऑईल गळत असल्यानं नागरिकांची ऑईल नेण्यासाठी झुंबड झाली आहे. 


जालन्यात बसला अपघात, 15 जण जखमी  


जालन्याच्या गोलापांगरी टोल नाक्याजवळ बसला अपघात झाला आहे. या अपघातात 15 जण जखमी झाले आहेत.  जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. 


नागपूर-अमरावती महामार्गावर असलेल्या पुलावरून भरधाव टेम्पो कोसळला


नागपूर-अमरावती महामार्गावर असलेल्या पुलावरून भरधाव टेम्पो कोसळला आहे. अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.  तर ज्या घरावर टेम्पो कोसळला त्या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला आहे. ही घटना मध्यरात्री घडली असून पोलीस स्टेशन हिंगणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे