पुणे : प्रत्यारोपणासाठी फुफ्फुस (Lungs Transplant) घेऊन निघालेल्या (Pune news) रुग्णवाहिकेचा टायर फुटून अपघात झाला. एका व्यक्तीला जीवदान द्यायचं असल्यानं जखमी डॉक्टरांनी प्रसंगावधान दाखवले आणि थेट कारने प्रवास सुरु केला. दोन तास उशीर झाला खरा, पण सुदैवाने शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. अंगावर काटा आणणारी ही घटना पिंपरी चिंचवड ते चेन्नई या प्रवासादरम्यान घडली. 


नेमकं काय घडलं?


हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण तज्ञ डॉक्टर संजीव जाधव  स्वतः रुग्णवाहिकेत पुढं बसलेले होते. डॉ जाधवांनी पिंपरी चिंचवडच्या डॉ डी वाय पाटील रुग्णालयात एका दात्याची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर ते फुफ्फुस चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात न्यायचे होते. डॉ डी वाय पाटील रुग्णालय ते पुणे विमानतळ हा प्रवास रुग्णवाहिकेतून सुरू झाला. मात्र हॅरीस ब्रिजजवळ सायंकाळी पाचच्या सुमारास रुग्णवाहिकेचा टायर फुटला आणि चालकाचा रुग्णवाहिकेवरील ताबा सुटला. रुग्णवाहिका दोन-तीन वाहनांना धडकली आणि शेवटी डिव्हायडरमध्ये रुग्णवाहिका अडकली. अन्यथा रुग्णवाहिका पुढं नदीत कोसळली असती.


स्वत: जखमी पण चेन्नई गाठून केली शस्त्रक्रिया...


रुग्णवाहिकेत ड्रायव्हर शेजारी बसलेले डॉक्टर जाधव, ज्युनिअर डॉक्टर आणि दोन टेक्निशियन जखमी झाले होते. मात्र धोका इथंच टळला नव्हता, पुढं फुफ्फुस चेन्नईला वेळेत पोहचवण्याचं आव्हान होतं. त्यामुळं दुसऱ्या रुग्णवाहिकेची वाट पाहता येणार नव्हती, मग जखमी अवस्थेत असलेल्या डॉक्टर जाधवांनी खासगी वाहन बोलावलं आणि त्यात फुफ्फुस घेऊन पुणे विमानतळपर्यंतचा प्रवास केला. तिथून विमानाने ते चेन्नईला पोहचले. सायंकाळी 6:30 वाजता पोहचण्याचं उद्धिष्ट होतं पण पोहचायला 8:30 झाले. त्यानंतर ही जखमी अवस्थेत असणाऱ्या डॉ. जाधवांनी त्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली.


या रुग्णाला फुफ्फुसाचा कर्करोग होता


शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून रुग्ण ाची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शस्त्रक्रिया करण्यात आलेला रुग्ण 72 दिवस लाईफ सपोर्टवर होता. त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होता. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती बरी होत आहे. डॉक्टरांचा स्वत:चा अपघात झाल्यानंतरही डॉक्टरांनी आपला धीर न सोडता परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आणि प्रसंगावधान दाखवून रुग्णाला जीवनदान दिलं आहे. त्यामुळे डॉक्टरांचं सध्या सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. त्यासोबतच रुग्णाच्या नातेवाईकांनीदेखील डॉक्टरांचे आभार मानले आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Dhirendra Shastri : धीरेंद्र शास्त्रींचं आधी वादग्रस्त वक्तव्य नंतर थेट देहूत जात तुकाराम महाराजांचं दर्शन, पाहा फोटो...