लोणावळा : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या लोणावळ्यात तुम्ही थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी निघाला असाल, तर थोडं थांबा. कारण लोणावळ्यातील 16 हॉटेल्सचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर आणखी 49 हॉटेल्सवर अशीच कारवाई प्रतीक्षेत आहे.


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लोणावळ्यातील सर्व हॉटेल्समध्ये सांडपाणी प्रक्रिया यंत्र बसवण्याच्या सूचना दीड वर्षापूर्वीच दिल्या होत्या. इतकंच काय, यासाठी बैठका घेऊन कारवाईचा इशारा दिला, नोटिसाही धाडल्या. मात्र या नोटिसांना हॉटेल्सनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळेच 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला 16 हॉटेल्सचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

लोणावळा आणि खंडाळ्यात जवळपास 125 हॉटेल्स आहेत. पैकी 65 हॉटेल्सना गेल्या काही महिन्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसा धाडल्या तर स्टार रेजेन्सी, साई मोरेश्वर रिसॉर्ट, कुमार रिसॉर्ट, ग्रीनलँड डेल्सल रिसॉर्ट, हॉटेल रेनबो रिट्रीट, हॉटेल ऍरिस्टो, हॉटेल व्हिस्परिंग वुड्स, साहिल सरोवर पोर्टिको, हॉटेल व्हॅलारिना, लायन्स डेन हॉटेल प्रा. लि., द ब्ल्यू लगुण रिसॉर्ट, हॉटेल निताज इन, हॉटेल साफिरे आणि ज्वेल रिसॉर्ट यांच्यावर थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

थर्टी फस्टचा सीझन संपल्यानंतर कारवाई करायला हवी, अशी मागणी हॉटेल्स असोसिएशन आणि काही पर्यटकांनी केली आहे. तर दुसरीकडे, लोणावळ्यातील निसर्गाचा आनंद घ्यायला येणाऱ्या पर्यटकांनी मात्र या कारवाईचे स्वागत केलं आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या कारवाईचे खरं तर स्वागतच आहे. मात्र फक्त पर्यटनस्थळांवरील हॉटेल्सवरच कारवाईचा बडगा उगारणं कितपत योग्य आहे?, या प्रश्नाचं उत्तर मंडळाने द्यायला हवं. पण आता कारवाई सुरु असल्याने थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांनी तुमच्या मुक्कामस्थळी वीज आणि पाणी पुरवठा सुरु आहे का, याची खात्री लोणावळ्यात जाण्यापूर्वीच करावी.