पिंपरी चिंचवड : तुम्ही तुमचे केस सिल्की करण्यासाठी किंवा कोंडा कमी करण्यासाठी शॅम्पू वापरत असाल, तर सतर्क राहण्याची गरज आहे. कारण पिंपरी चिंचवडमध्ये बनावट ब्रँडेड शॅम्पू बनवणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
डव्ह, सनसिल्क, हेड अँड शोल्डर आणि लॉरियल अशा नामांकित कंपनीचे बनावट शॅम्पू कारवाईत जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या असून, डव्हच्या 325, सनसिल्कच्या 154, हेड अँड शोल्डरच्या 130 आणि लॉरियलच्या 142 बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी पुण्याच्या सहकारनगर येथे राहणाऱ्या भाग्यश्री यादव यांनी तक्रार दिली होती. हे शॅम्पू दुकानांमध्ये तर थेट ग्राहकांनी अल्प दरात विकले जात होते.
भंगारातून या बाटल्या गोळा केल्या जात होत्या आणि केमिकल पावडर वापर करुन शॅम्पू तयार केले जात होते. पिंपरीच्या कामगार नगर येथील गंगानगर सोसायटीमध्ये हा प्रकार सुरु होता.