Pune Rain Supriya Sule पुणे: पुण्यात मुसळधार पावसामुळे (Pune Heavy Rain) अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सरकारवर निशाणा साधला.


पुण्यातील परिस्थिती अतिशय चिंताजनक आणि भयानक आहे. मला आश्चर्य वाटलं, जेव्हा मंत्री पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे, असं बोलत आहे. सर्व यंत्राणा कामाला लागली आहे. त्याबद्दल मी मंत्रींचे आभार मानते. परंतु नियंत्रणात काहीही नाही. लोक पॅनिक झाले आहेत. लोकांकडे खाण्यासाठी-पिण्यासाठी काहीही नाहीय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 


पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही-


पुण्यात ज्या प्रकारची कामं झालीत, त्यामुळे पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही. खासदार मुरलीधर मोहळ म्हणाले की, नद्यांच्या पात्रांजवळ जास्त पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, मेट्रोची काम झालीत, यावेळी नाल्याचं प्लॅनिंगच नाही झालं मी नेहमी सांगत आलीय, विकास कामाच्याबाबतीत हलगर्जीपणा नको. गेले अनेक वर्षे प्रशासनाकडून इन्फ्रास्ट्रक्चरची काम झालेली आहे, त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडला जातोय, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केली. 


उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश-


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. पुण्यातील अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने तात्काळ उपायोजना करण्यासंदर्भात आदेश अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. अजित पवार साडेनऊ वाजता मंत्रालयात पोहोचणार आहेत. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहुन नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही अजित पवारांनी केले आहे.


आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा-


आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं आज या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट दिला आहे.



संबंधित बातमी:


जगबुडी नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली; रायगड, रत्नागिरीत महापूर, धोक्याची घंटा वाजवत नागरिकांना इशारा