Pune Rain News : पुण्यात रात्रभर तुफान पाऊस (Pune Heavy Rain) सुरु आहे. या पावसामुळं सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. या मुसळधार पावसामुळं सिंहगड रस्ता (Sinhagad Road) 5 सोसायटीमध्ये पाणी घुसले आहे. या ठिकाणी मदतीसाठी कोणतीही यंत्रणा आली नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. यामध्ये 2 लोक अडकल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. 


दरम्यान, मुसळधार पावसामुळं खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) सोडण्यात येणारा पाण्याच्या विसर्ग वाढवण्यात आला आहे. संध्याकाळी धरणातून मुठा नदीमध्ये 9 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु होता. आता तो विसर्ग वाढवला आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग सकाळी 6 वाजता 35574 क्यूसेक्स करण्यात आला आहे. तसेच धरण परिसरात 100 मिमी व घाटमाथ्यावर 200 मिमी पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या पावसामुळे पुणे शहरातील मोठ्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. 


शहरातील पुढील ठिकाणी त्वरित दक्षता घेण्यात यावी


भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे .
गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर .
शितळा देवी मंदिर डेक्कन.
संगम पूल पुलासमोरील वस्ती 
कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्याची दक्षता घ्यावी.
होळकर पूल परिसर


पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील शाळा आज राहणार बंद


हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळं या भागातील शाळा 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे. दरम्यान, आजही राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातही मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.