Pune Rain Update : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या पुण्यात पावसाची (Pune Rain) तुफान बॅटिंग सुरु आहे. सिंहगड रोड परिसरातील अनेक घरात पाणी शिरलं आहे. दरम्यान, आज देखील पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. 


शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर


हवामान विभागान येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा आणि महाविद्यालये आज (25 जुलै) बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे. पुण्यात रात्रभर तुफान पाऊस (Pune Heavy Rain) सुरु आहे. या पावसामुळं सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे.


मुळशी ताम्हणी घाटात दरड कोसळली


पुणे जिल्ह्यातील मुळशी ताम्हणी घाट येथे मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं दरड कोसळलेली आहे. रस्ता बंद आहे. पोलीस अधिकारी स्टाफ, तहसीलदार, प्रांत अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून दरड काढण्याचे काम सुरु आहे.


आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा


आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं आज या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट दिला आहे.


महत्वाच्या बातम्या:


Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, खडकवासला धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर